हिंगोली (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांचे वेळेत निराकरण व्हावे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या जनसंवाद उपक्रमांतर्गत सोमवारी हिंगोली येथे तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दरमहा परिक्षेत्रातील जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या दौऱ्यादरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक संबंधित जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेत आहेत. या उपक्रमातून तक्रारींचे प्रभावी व जलद निवारण करण्याबरोबरच पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यावर भर दिला जात आहे. सोमवार, २९ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी १३ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. प्राप्त अर्जांमध्ये मारहाण, सायबर फसवणूक, गुन्ह्यांच्या तपासातील प्रलंबित बाबी तसेच इतर विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, तक्रार निवारण प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी नांदेड परिक्षेत्र कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या संवेदना प्रणालीद्वारे या सर्व अर्जांची पुढील चौकशी व पाठपुरावा केला जाणार आहे. प्रत्येक प्रकरणातील कार्यवाहीवर नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीम सातत्याने लक्ष ठेवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 916 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड बसस्थानकावरील चहा-कॉफी सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली नांदेडमध्ये घरात घुसून मारहाण व विनयभंग करणाऱ्या चौघांना तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा