नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड येथील मुख्य एसटी बसस्थानक परिसरातील एका चहा-कॉफी सेंटरला आज अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. भरदिवसा बसस्थानक परिसरात आग लागल्यामुळे प्रवासी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी दुकानाचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य बसस्थानकातील मॅजिक चहा कॉफी सेंटर या दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. याची माहिती मोहम्मद कोतवाल यांनी तातडीने नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाला दिली. माहिती मिळताच अधिकारी व जवान अग्निशामक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. होज रीलच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून त्यांनी काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली. दुकानाचे मालक संजय बहादूर सिंग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे १० बाय १० फूट आकाराच्या दुकानातील सिलिंग, फ्रिज, थर्मास, स्टीलची भांडी तसेच गॅस सिलेंडर आगीत जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे शेजारील दुकाने वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. दुकानाच्या उजव्या बाजूला असलेले साईनाथ घोडके यांचे साई पूजा ऑप्टिकल हे दुकान सुरक्षित राहिले असून त्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे संभाव्य नुकसान टळले. तसेच डाव्या बाजूला असलेले पवन राठोड यांचे नवनाथ रसवंती हे दुकानही आगीपासून सुरक्षित बचावले. बसस्थानक परिसरात सतत प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने आग आणखी पसरली असती तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधान, तत्परता आणि शौर्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली आणि बसस्थानक परिसरातील मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. आग लागण्याच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 932 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आगमनानंतर ३५ पोलीस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त होणार हिंगोलीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद; १३ तक्रारदारांच्या समस्या ऐकून तत्काळ कार्यवाहीचे निर्देश