नांदेडमध्ये १४ ते १६ ऑगस्टदरम्यान सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव-२०२६ नांदेड (प्रतिनिधी ) – भारतीय संस्कृती, लोककला, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि सर्वसमावेशक विकासाचा संगम घडविणारा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव-२०२६ नांदेड येथे १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान कुसुम सभागृहात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. सप्तरंग सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात देशातील ८ राज्यांमधून सुमारे ५०० कलाकार सहभागी होणार असून ४७० हून अधिक विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, लावणी, उपशास्त्रीय नृत्य, गायन, वाद्यवादन आणि समूह नृत्य अशा विविध कलाप्रकारांची मेजवानी नांदेडकरांना अनुभवता येणार आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा दोन स्वतंत्र रंगमंच उभारण्यात आले आहेत. त्यांना ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले रंगमंच’ आणि ‘कै. तिजनबाई रंगमंच’ अशी नावे देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरशालेय वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. देशभक्ती, संस्कृती, पर्यावरण, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्ये या विषयांवर या स्पर्धा होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मोफत भव्य आरोग्य सेवा शिबिर. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. फिजिओथेरपी, नेत्रतपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, दंत तपासणी, ईसीजी, एंडोस्कोपी तसेच पोटाच्या विकारांबाबत विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी तृतीयपंथी सक्षमीकरण चर्चासत्र, जनजागृती अभियान आणि रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजना, स्वावलंबन, रोजगाराच्या संधी, सामाजिक न्याय, कायदेशीर हक्क आणि सक्षमीकरणाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सप्तरंग जीवन गौरव पुरस्कार, स्वर्गीय भावना जेठवानी महिला भूषण पुरस्कार, कला भूषण, साहित्य भूषण, सामाजिक आयकॉन, आरोग्य भूषण, सिंधूभूषण, कला संवर्धन, धर्मजागृती आणि समाजसेवा पुरस्कारांचा समावेश आहे. या महोत्सवाचे आयोजन डॉ. सान्वी जेठवानी यांच्या नेतृत्वाखाली होत असून त्या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, नांदेडच्या विशेष कार्यकारी अधिकारी तसेच सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. राज्य शासनातील मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय व पोलीस अधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू, महानगरपालिका अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा महोत्सव राज्यस्तरीय सांस्कृतिक पर्व ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 830 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इंदरजितसिंग बावरीच्या खून प्रकरणात के बी गँगचे पाच जण पोलिसांच्या ताब्यात इराणवर ब्लिट्झक्रेग हल्ला? इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांची गुप्त रणनीती उघड!