नांदेड (प्रतिनिधी) – आजकाल काही बातम्या अशा पद्धतीने सादर केल्या जातात की, सत्याचा शोध कमी आणि सनसनाटीचा बाजार अधिक दिसू लागतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे तो थेट गुन्हेगार ठरत नाही, ही न्यायव्यवस्थेची मूलभूत शिकवण आहे. पण काही ठिकाणी न्यायालयाचा निकाल येण्याआधीच पत्रकारितेचा निकाल लागल्याचे चित्र दिसते. अर्धापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कऱ्हाळे यांनी एका व्यक्तीसोबत वाढदिवस साजरा केल्याची बातमी काही वर्तमानपत्रे आणि एबीपी न्यूजने प्रसारित केली. परंतु सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, ज्या व्यक्तीबाबत उल्लेख करण्यात आला आहे, त्याचा गुन्हा अद्याप न्यायालयात सिद्ध झालेला नाही. तो सध्या जामिनावर मुक्त आहे. कायद्याच्या भाषेत तो आरोपी आहे, गुन्हेगार नव्हे. पण काहींना कायद्याची भाषा कमी आणि मथळ्यांची भाषा जास्त प्रिय झाल्याचे दिसते. प्राप्त माहितीनुसार, साई हॉटेलमध्ये झालेल्या वाढदिवस समारंभात पोलीस अंमलदार संतोष काळे यांचाही सहभाग होता. काही वृत्तपत्रांनी तर छायाचित्रांमध्ये क्रमांक टाकून जणू ओळखा पाहू स्पर्धाच भरवली. प्रश्न असा आहे की, वाढदिवसासारख्या वैयक्तिक कार्यक्रमातील फोटो बातमीचा विषय होतात, पण त्याच निकषाने इतर छायाचित्रांकडे दुर्लक्ष का होते? आमच्याकडे उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमध्ये अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना माधव राजेगोरे पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात शंकर टेकाळे त्यांना नारळाचे रोप भेट देताना दिसतात. त्या कार्यक्रमांचा संदर्भ काय, हे आम्हालाही माहीत नाही. पण मग प्रश्न असा पडतो की, जर विष्णू कऱ्हाळे यांचे फोटो पत्रकारांच्या हाती सहज लागू शकतात, तर कदम साहेबांचे फोटो त्यांच्या नजरेतून नेमके कसे सुटले? की काही छायाचित्रांवर प्रकाशझोत आणि काहींवर अंधारझोत टाकण्याची नवी पत्रकारिता सुरू झाली आहे? जर या प्रकरणात चौकशीची मागणी होत असेल, तर ती सर्वांसाठी समान निकषाने व्हायला हवी. एकाला मोजपट्टी आणि दुसऱ्याला गजपट्टी हा न्यायाचा मार्ग नाही. निवडक राग आणि निवडक जाग ही पत्रकारितेची ओळख होऊ नये. यामुळे काही प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतात. विष्णू कऱ्हाळे यांच्याच नावाभोवती इतका धुरळा का उडवला जात आहे? एखाद्या अधिकाऱ्याविरोधात बातमीचा भिंग लावला जातो आणि दुसऱ्याविरोधात मौनाचा पडदा टाकला जातो, असे का? पत्रकारितेची जबाबदारी म्हणजे सत्याचा शोध, व्यक्तींची निवडक शिकार नव्हे. ज्येष्ठ गीतकार स्वर्गीय जगदीश खेबुडकर यांनी म्हटले होते “पत्रकारांची लेखणी दुधारी लागू नये कोणाच्या जिव्हारी.” आज या वाक्याची आठवण पुन्हा करून द्यावीशी वाटते. चूक असेल तर ती नक्की शोधा, उघड करा आणि ठळकपणे मांडा. पण सत्याच्या नावाखाली संशयाचे पीक पेरण्याचा अधिकार कोणालाही नाही. कारण बातमीचा एक शब्द कधी कधी न्यायालयाच्या निर्णय या पेक्षाही मोठी शिक्षा ठरू शकतो. पत्रकारितेचे सामर्थ्य हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून आहे; परंतु स्तंभ जर एका बाजूला झुकला, तर इमारतही डळमळते. त्यामुळे लेखणी धारदार असावी, पण न्यायबुद्धीपेक्षा तीक्ष्ण नसावी; आणि प्रकाशझोत पडावा तो सत्यावर,व्यक्तीविशेषांवर नव्हे. Kanthak Suryatal Post Views: 1,559 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्मार्ट मीटर आधी की स्मार्ट सेवा? सर्वसामान्य वीज ग्राहकांचा रास्त प्रश्न अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भव्य सत्कार