स्वातंत्र्य दिनी पोलीस अधीक्षक नागरिकांच्या सुरक्षेचा संकल्प नांदेड (प्रतिनिधी)- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, निमंत्रित मान्यवर, पत्रकार बांधव तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉ. रोहन म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ हा भारतीय इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासह असंख्य वीरांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नसून प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता, सन्मान आणि सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार मिळणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. संविधानाने दिलेली मूल्ये जपणे आणि देशाची एकता व अखंडता अधिक मजबूत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस दलाची जबाबदारी अधिक व्यापक आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हे पोलीस दलाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे डॉ. रोहन यांनी नमूद केले. बदलत्या काळात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत असून सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अमली पदार्थ तसेच महिला व बालकांवरील अत्याचार ही गंभीर आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत पोलीस दलाचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, सतर्कता आणि व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संदेश देताना डॉ. नीलाभ रोहन म्हणाले की, आपला गणवेश हा अधिकारापेक्षा मोठी जबाबदारी आहे. गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करताना सामान्य नागरिकांशी संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा, पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्याचा आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. Kanthak Suryatal Post Views: 586 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शहाजी उमाप आणि श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सह १२ अंमलदारांचा गौरव; अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक जाहीर जनधन खाती रिकामी आणि कर्ज २०० लाख कोटी! विकसित भारताच्या दाव्यांमागचे भीषण वास्तव