राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा उद्देश निश्चितच चांगला आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी महावितरणने स्मार्ट, सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख सेवा देणे अधिक आवश्यक नाही का? आजही अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होणे, कमी-जास्त व्होल्टेजचा पुरवठा, धोकादायक अवस्थेतील लोंबकळणाऱ्या वीज तारा, झाडांच्या फांद्यांचा तारांना होणारा स्पर्श, उघडे ट्रान्सफॉर्मर बॉक्स, तक्रारींना वेळेवर प्रतिसाद न मिळणे, तसेच वीज चोरीमुळे वितरण व्यवस्थेवर येणारा अतिरिक्त भार अशा अनेक समस्या कायम आहेत. या समस्यांमुळे ग्राहकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे. सर्व ग्राहकांना नियमानुसार 230 व्होल्टचा स्थिर आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा. मुख्य वीज वाहिन्यांखाली आवश्यक त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड वायर बसविण्यात याव्यात. लोंबकळणाऱ्या आणि धोकादायक अवस्थेतील वीज तारा तात्काळ दुरुस्त कराव्यात. वीज वाहिन्यांना लागून असलेल्या झाडांच्या फांद्या नियमितपणे छाटण्यात याव्यात. ट्रान्सफॉर्मर व डीपीजवळील उघडे बॉक्स सुरक्षित करून कायमस्वरूपी बंद ठेवावेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती करून वीज सुरू करण्यात यावी. कॉल सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा आणि आपत्कालीन सेवा अधिक जबाबदार व उत्तरदायी कराव्यात. जीर्ण वीज वाहिन्या, खराब इन्सुलेटर, गंजलेले खांब आणि जुनी उपकरणे वेळेत बदलण्यात यावीत. सर्व प्रमुख वीज वाहिन्या टप्प्याटप्प्याने भूमिगत (Underground) करण्यात याव्यात, ज्यामुळे वीज चोरी, अपघात, वादळ व पावसामुळे होणारे खंडित पुरवठे मोठ्या प्रमाणावर कमी होतील. यासोबतच वीज बिलातील विविध आकारांबाबतही ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येते. ग्राहकांचे मत आहे की, स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, इतर विविध अधिभार आणि अतिरिक्त आकार यांची रचना अधिक पारदर्शक व न्याय्य असावी. ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरलेल्या विजेच्या युनिटनुसार स्पष्ट आणि समजण्यास सोपे बिल मिळावे, अशी अपेक्षा आहे. तसेच, वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून वितरणातील नुकसान कमी करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. प्रामाणिकपणे आणि नियमितपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून वितरणातील नुकसान भरून काढण्याऐवजी, वीज चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी ग्राहकांची भावना आहे. स्मार्ट मीटर ही केवळ मीटर बदलण्याची योजना नसून ती संपूर्ण वीज व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाशी संबंधित बाब आहे. त्यामुळे प्रथम सुरक्षित, अखंड, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण वीज सेवा उपलब्ध करून देणे, वीज चोरी रोखणे, भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. ग्राहकांना स्मार्ट सेवा, स्मार्ट सुरक्षा, स्मार्ट तक्रार निवारण आणि स्मार्ट पारदर्शकता मिळाल्यानंतरच स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत व्यापक चर्चा व विचार होणे गरजेचे आहे. आज सर्वसामान्य ग्राहकांचा एकच प्रश्न आहे स्मार्ट मीटरच्या आधी स्मार्ट सेवा का नाही? – राजेंद्र सिंघ शाहू नांदेड 7700063999 Kanthak Suryatal Post Views: 892 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १५ जूनचा मोठा धमाका: अमेरिका-इराण समझोता आणि युद्धाच्या छायेत शांततेचा प्रयोग एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष