नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मधील हमीदिया कॉलनी परिसरात वीज खांबात उतरलेल्या करंटमुळे एका ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या (एमएसईबी) कथित निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत बालकाचे नाव आदिल साजिद खान पठाण (वय ७) असे आहे. त्याचे वडील साजिद खान पठाण हे मूळचे लोहा तालुक्यातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने नांदेड येथील हमीदिया कॉलनीत वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आदिल घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. बराच वेळ उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना शोधकार्याचे आवाहन करण्यात आले. रात्री उशिरा परिसरातून जाणाऱ्या एका वाहनचालकाला वीज खांबाजवळ एक मुलगा पडलेला दिसला. त्याने तत्काळ स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता आदिलचा करंट लागून मृत्यू झाल्याचे उघड झाले. प्राथमिक माहितीनुसार, परिसरातील तुटलेल्या सर्व्हिस वायरमुळे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.खरे तर पावसाच्या अगोदर वीज वितरण कंपनीने अनेक कामे करायची असतात. ती कामे योग्य पद्धतीने केली नाही तर असे प्रकार घडतात असे तज्ञ सात होते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, धोकादायक वीज तारा, तुटलेल्या वायर आणि वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांबाबत अनेक वेळा देगलूर नाका येथील महावितरण कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही याच परिसरात करंट लागून एका शेळीचा मृत्यू झाला होता. तरीही आवश्यक दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा जीव गेला, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. घटनेनंतर आदिलला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची, तसेच मृत मुलाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व न्याय देण्याची मागणी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,393 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मृग बरसला वेळेवर …. ९९% न्यायव्यवस्था ही भीतीच्या सावटाखाली असतांना न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांच्या निर्णयाला सलाम