नांदेड(प्रतिनिधी)- तालुक्यातील सिद्धनाथ येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने राबविलेल्या नैसर्गिक शेती व शाश्वत कृषी उपक्रमांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-2026’ अंतर्गत गटाने उभारलेल्या विविध प्रकल्पांचे त्यांनी कौतुक करत महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेचा लाभ घेऊन मूल्यवर्धित प्रकल्प उभारावेत, असे आवाहन केले. अन्नपूर्णा महिला शेतकरी गटातील 15 सदस्यांनी एकत्रितपणे 3 हजार लिटर जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक, 15 व्हर्मी बेडच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती, परसबाग विकास, वृक्षलागवड तसेच सोयाबीन पिकातील एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) अंमलबजावणी या उपक्रमांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मृदेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महिला गटातील समन्वय आणि नियोजनाचे विशेष कौतुक केले. सकारात्मक ऊर्जा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या बळावर राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा देत, PMFME योजनेतून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीतून टाळ-मृदंगाच्या गजरात मान्यवरांची मिरवणूक काढून औक्षणाने स्वागत केले. कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच, शिवानंद स्वामी मठ संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी गटाने जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा उभारावी, त्यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच भविष्यात सीड बँक उभारून स्थानिक बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी व विक्रीद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा सल्ला दिला. कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर कैलास पेरके यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले, तर पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रवीण खुळे यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेची माहिती देत नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप, उपकृषी अधिकारी लक्ष्मण चचुवार, सहाय्यक कृषी अधिकारी वसंत जारीकोटे, कैलास पेरके, पाणी फाउंडेशनचे प्रवीण खुळे व विशाल इंगळे, उमेदचे तालुका समन्वयक हनुमंत कंदुरके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जारीकोटे यांनी केले, तर गटाच्या निमंत्रक जयश्री आवातीरक यांनी एसओपी अंमलबजावणीची माहिती देऊन आभार मानले. Kanthak Suryatal Post Views: 453 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन CAG चा धक्कादायक खुलासा: १५ मंत्रालयांच्या ₹५४,२८२ कोटी खर्चापैकी ₹३३,९७३ कोटींचा कोणताही हिशोब नाही!