नांदेड (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने भक्कम पावले टाकली असून केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचला आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
खा. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संचिकेवर स्वाक्षरी करून शेतकऱ्यांप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जात असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे.
देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, पूर्वी दहशतवादी कारवायांना केवळ निषेधाची भाषा होती. मात्र नव्या भारताने स्वस्थ न बसता सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांद्वारे देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, हे जगाला दाखवून दिले. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.
केंद्र सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध योजनांमधील गैरप्रकारांना आळा घातला. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमुळे शासनाच्या तिजोरीतील सुमारे 4.31 लाख कोटी रुपयांची बचत झाली असून हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे मध्यस्थांची साखळी तुटून पारदर्शकता वाढल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले असून किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत सुमारे 7 कोटी किसान कार्डधारकांना 10 कोटी रुपयांहून अधिक कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
देशातील अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात बोलताना खा. चव्हाण यांनी नक्षलवादाविरुद्ध सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. अनेक भागांत नक्षलवादी कारवायांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले असून देश नक्षलवादमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनधन योजनेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आर्थिक समावेशनाचे मोठे उद्दिष्ट साध्य करत 58 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात यश आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या मोफत धान्य योजनेद्वारे 81 कोटी नागरिकांना मोफत राशन उपलब्ध करून देण्यात येत असून ही योजना गरीबांसाठी मोठा आधार ठरली आहे.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रवीण साले, विजय येवनकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
