नांदेड (प्रतिनिधी)- पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंघ बादल यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा श्री माता साहिब देवाजी येथे झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी जसपाल सिंघ वकील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुदखेड न्यायालयाने त्याला २४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचा पुण्याशी संबंध असून तो पूर्वी पुण्यात वकिली करत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. गुरुवारी दर्शनासाठी गुरुद्वारात आलेले सुखबीर सिंघ बादल बाहेर पडत असताना आरोपीने त्यांच्या दिशेने धारदार कृपाणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तो सरेंडर असे ओरडत असल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोराचा वार बादल यांच्या छातीच्या दिशेने होता; मात्र नांदेड पोलिसांचे पोलीस निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावर झेप घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या झटापटीत बादल यांच्या हाताला दुखापत झाली, तर निरीक्षक केंद्रे यांनाही दुखापत झाली. घटनेनंतर आरोपीला घटनास्थळावरूनच पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. आरोपीची पार्श्वभूमी, हल्ल्याचे कारण आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, विशेष सुरक्षा पथकाचे वरिष्ठ अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ नांदेडमध्ये दाखल झाले असून घटनेची चौकशी सुरू आहे. सुखबीर सिंघ बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. धार्मिक स्थळे निवडून हल्ले केले जात आहेत, अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपण अशा घटनांना घाबरणार नसल्याचे सांगितले. उपचारानंतर सुखबीर सिंघ बादल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले. त्यांनी शांतता आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. या संपूर्ण घटनेत पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या काही सेकंदांच्या धाडसी हस्तक्षेपामुळे हल्ल्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि सुखबीर सिंह बादल यांचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सुखबीर सिंघ बादल यांचा व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/08/Suskhbir-singh-Badal-Bite.mp4 आरोपी जसपालसिंघ वकील .. Kanthak Suryatal Post Views: 1,307 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation PMO मध्ये बंडाळी? राहुल गांधींचा दावा आणि सत्तेच्या पडद्यामागचे सत्य! अर्धापूरात खळबळ: खंडणीखोर आरटीआय कार्यकर्ता आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचे संगनमत