घटनेचा तपशील: ही हृदयद्रावक घटना ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथे घडली होती. पीडित मुलगी घरात एकटी असताना पाऊस सुरू झाला. यावेळी समोरच राहणाऱ्या आरोपी बाबुराव जाधव याने घराबाहेरील कपडे काढून आत ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने पीडितेने आपल्या घरात बोलावले. मुलगी घरात गेल्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा लावून घेतला आणि पीडितेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडून तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर तिच्यावर दोनदा बलात्कार केला. सायंकाळी पीडितेने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन कामकाज आणि पुरावे: विशेष न्यायाधीश एस. पी. देशमुख यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. बी. खिल्लारे यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. या प्रकरणात पीडितेची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले. विशेषतः डीएनए चाचणीमध्ये पीडितेच्या कपड्यांवरील डाग आणि आरोपीचे रक्ताचे नमुने जुळल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.
न्यायालयाचा निर्णय: न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत दोषी ठरवले. ७२ वर्षांचे वय असूनही आरोपीने केलेल्या कृत्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला कोणतीही सवलत देण्यास नकार दिला.आरोपीचा बचाव ऍड. आर.जी.इमडे यांनी केला होता.
शिक्षेचे स्वरूप:
- कलम ४ (पोक्सो): जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा.
- कलम ६ (पोक्सो): जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा.
- दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत.
याशिवाय, दंडाच्या रकमेतून पीडितेला १०,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आणि तिला मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे शिफारस करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याचा तपास मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सय्यद यांनी केला होता.
