सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगातील सिक्ख समाजाचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. जगभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धा, आस्था आणि भावनिक नाते या पवित्र स्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे या गुरुद्वाऱ्याची ऐतिहासिक परंपरा, मर्यादा, पाठपूजा आणि धार्मिक वैशिष्ट्ये अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
विशेष म्हणजे, सचखंड गुरुद्वाऱ्याच्या साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ चालत आलेल्या परंपरा आणि मर्यादा जतन करण्यात मराठवाड्यातील, विशेषतः नांदेडच्या स्थानिक शीख समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. अनेक संकटे, आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्थानिक समाजाने आपल्या श्रद्धा, त्याग आणि सेवाभावाच्या बळावर या पवित्र स्थानाची सेवा, देखभाल आणि परंपरा अखंडपणे जिवंत ठेवली आहे. हा इतिहास विसरून चालणार नाही. इतकेच नव्हे तर मराठवाड्यातील शीख समाज हा तीन ते साडेतीनशे वर्षांपासून या भूमीचा अविभाज्य घटक राहिला आहे. येथील शीख समाजाने महाराष्ट्राच्या भाषा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जीवनाशी पूर्णपणे एकरूप होत आपली स्वतंत्र धार्मिक ओळख जपत महाराष्ट्राच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शीख समाज हा केवळ धार्मिक समुदाय नसून महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
याउलट महाराष्ट्रातील इतर अनेक भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या बहुसंख्य शीख बांधवांचे पूर्वज विविध काळात इतर राज्यांतून स्थलांतरित होऊन किंवा भारताच्या फाळणीनंतर विस्थापित अवस्थेत महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. त्यांचा आदर राखत असे म्हणावे लागेल की, सचखंड गुरुद्वाऱ्याच्या ऐतिहासिक मर्यादा, परंपरा, स्थानिक धार्मिक रीतिरिवाज आणि नांदेडशी असलेले भावनिक नाते यांचा अनुभव आणि जिव्हाळा मराठवाड्यातील स्थानिक शीख समाजाला ज्या प्रमाणात आहे, त्याच प्रमाणात तो इतरांना असणे स्वाभाविकपणे अपेक्षित धरता येणार नाही. कारण ही भावना अनेक पिढ्यांच्या सेवेतून, त्यागातून आणि स्थानिक इतिहासाशी असलेल्या जिवंत नात्यातून निर्माण झालेली आहे. म्हणूनच नवीन कायदा तयार करताना स्थानिक शीख समाजाच्या भावना, अनुभव आणि ऐतिहासिक योगदान यांना योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. कारण या गुरुद्वाऱ्याविषयीची आत्मीयता, जिव्हाळा आणि भावनिक नाते स्थानिक समाजाच्या जीवनाशी घट्ट जोडलेले आहे. त्यांच्या रोमरोमात सचखंड गुरुद्वाऱ्याविषयीची सेवा आणि समर्पणाची भावना रुजलेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गुरुद्वारा बोर्डाचा कारभार प्रशासकांमार्फत चालविण्यात आला. परंतु बाहेरून नियुक्त केलेल्या प्रशासकांना स्थानिक परिस्थिती, धार्मिक परंपरा आणि दैनंदिन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सततची उपस्थिती राखणे अनेकदा कठीण गेले. प्रवास, निवास आणि प्रशासकीय खर्चामुळे बोर्डावर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याच्याही चर्चा वेळोवेळी झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधित्व असलेली, जबाबदार आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित व्यवस्थापन प्रणाली अधिक परिणामकारक ठरू शकते. लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत गाभा म्हणजे स्थानिक लोकांचा सहभाग. त्यामुळे नवीन कायद्यात स्थानिक शीख समाजाला विश्वासात घेऊन, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने व्यवस्थापनाची रचना करण्याचा विचार होणे आवश्यक आहे. स्थानिक प्रतिनिधी २४ तास उपलब्ध राहून सेवा, व्यवस्थापन, भाविकांच्या अडचणी आणि धार्मिक कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करू शकतात.
विशेषतः शासनाने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, सचखंड गुरुद्वाऱ्याच्या मर्यादा, परंपरा आणि व्यवस्थापनाबाबत निर्णय घेताना त्या परंपरा अनेक पिढ्यांपासून जपणाऱ्या स्थानिक समाजाच्या मताला प्राधान्य देणे हे लोकशाही आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार अधिक योग्य ठरेल. कोणतीही नवीन रचना स्थानिक समाजाच्या सहभागाशिवाय किंवा त्यांच्या विश्वासाशिवाय निर्माण झाल्यास भविष्यात अनावश्यक मतभेद आणि असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासोबतच नांदेड हे विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींचे शांततापूर्ण सहअस्तित्व जपणारे शहर आहे. गुरुद्वारा व्यवस्थापनात स्थानिक सहभाग वाढल्यास सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि शहराच्या विकासालाही सकारात्मक दिशा मिळू शकते.
जर शासनाने विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून नवीन कायदा तयार करण्याचा निर्णय घेतलाच, तर तो स्थानिक शीख समाज, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती तसेच नांदेडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊनच तयार करावा. अशा व्यापक चर्चेनंतर तयार होणारा कायदा अधिक न्याय्य, स्वीकारार्ह आणि दीर्घकालीन ठरेल.
या संपूर्ण प्रक्रियेत नांदेडचे आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन स्थानिक जनभावना, लोकशाही मूल्ये आणि सचखंड गुरुद्वाऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व यांचा सन्मान राखत योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
आज आवश्यकता आहे ती कोणत्याही एका गटाचा विजय किंवा पराभव ठरविण्याची नाही, तर सचखंड गुरुद्वाऱ्याची गौरवशाली परंपरा, धार्मिक मर्यादा, स्थानिक भावविश्व आणि लोकशाही मूल्ये यांचे संरक्षण करणारा संतुलित व दूरदृष्टीचा कायदा निर्माण करण्याची आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन कायदा तयार करण्यापूर्वी नांदेड व मराठवाड्यातील स्थानिक शीख समाजाच्या ऐतिहासिक भूमिकेचा, त्यागाचा, भावनिक नात्याचा आणि दीर्घकालीन योगदानाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. सचखंड गुरुद्वारा हा केवळ एका समाजाचा विषय नाही, तर तो नांदेडच्या ओळखीचा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि जगभरातील शीख श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणताही नवीन कायदा करताना धार्मिक परंपरा, स्थानिक भावना, ऐतिहासिक योगदान आणि लोकशाही सहभाग यांचा समतोल साधणे हेच शासनासमोरील सर्वात मोठे कर्तव्य ठरणार आहे.
– राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999
