कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा – प्रमोद अशोकराव अंभोरे सेलू (प्रतिनिधी) – बोरी येथील सिमणगावचे रहिवासी प्रकाश दशरथ गायकवाड (वय ६०) यांच्यावर २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०० ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान कानड फाटा येथे कथितपणे जातीवाचक शिवीगाळ करत निर्घृण मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, बाळू टेकाळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली तर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य ५ ते ६ जणांनी गाडी अडवून लाथाबुक्क्यांनी व जबर मारहाण केल्याचे पीडित प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. या हल्ल्यात प्रकाश गायकवाड यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून छाती, पोट, पाठ व तोंडावर मुक्का मार दिल्याने दुखापती झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, घटना घडून तब्बल तीन दिवस उलटूनही संबंधित आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडितांचे पुत्र शंकर गायकवाड यांनी १ ऑगस्ट २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्याशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष तथा रुग्णहक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, तालुका उपाध्यक्ष तुकाराम लोखंडे, विजय सावंत आणि संदीप वायवळ यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन पीडित प्रकाश गायकवाड यांची भेट घेतली व संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी बोरी पोलीस ठाण्याच्या बिट जमादारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पीडिताचे बयान नोंदवावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह लागू असलेल्या सर्व कलमांखाली निष्पक्ष गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. प्रमोद अंभोरे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, दलित समाजातील ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या या अमानुष हल्ल्यात आरोपींना संरक्षण दिले जात असेल किंवा पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. अन्याय सहन केला जाणार नाही आणि दोषींना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.या गंभीर प्रकरणात बोरी पोलीस प्रशासन नेमकी कोणती आणि कितपत प्रभावी कारवाई करते, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 584 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पेट्रोल पंपावर रॉडने, तर महेबुबिया कॉलनीत चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे अर्धापूर पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई; 10 गोवंशांची सुटका, 31.51 लाखांचा मुद्देमाल जप्त