नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे म्हणून बनचिंचोली येथील शेतकऱ्याने हदगावच्या बॅंकेतून पैसे काढले आणि यावर लक्ष ठेवून चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे खाली पडल्याची हुल देवून त्यांचे बॅगमधील 3 लाख 60 हजार रुपये चोरून नेले आहेत.
मौजे बनचिंचोली ता.हदगाव येथील पांडूरंग पंडीतराव मिरासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी हदगाव येथील बॅंकेतून 3 लाख 60 हजार रुपये काढले आणि ते पैसे दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवरील पाकीटात ठेवले. त्यामध्ये 3 लाख रोख रक्कमेसह आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक असे कागदपत्रेपण होती. ते हदगाव ते बनचिंचोली रस्त्यावरून जात असतांना नागोराव पौळ यांच्या शेताजवळ एका चोरट्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सांगितले. आपल्या दुचाकीवरुन उतरून पांडूरंग मिरासे हे खाली पडलेले पैसे उचलत असतांना त्यांची नजर चुकवून त्या चोट्याने 3 लाख 60 हजार रुपये चोरू नेले आहेत. हदगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 246/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक उमेश रायबोले अधिक तपास करीत आहेत.