नांदेड (प्रतिनिधी)- भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण शहरात अभूतपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.जय भीमच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला होता. शहरातील मुख्य पुतळा परिसर आणि विविध भागांत भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे जणू निळा जनसागरच रस्त्यावर उतरल्याचा भास होत होता. जयंतीचा उत्साह १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच सुरू झाला होता शहराच्या रेल्वे स्थानकजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने युवक एकत्र जमले होते. मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. यावेळी ढोल-ताशा पथकांनी दिलेल्या मानवंदनेने वातावरणात चैतन्य भरले. त्यानंतर भीम गीत गायकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, जे पहाटेपर्यंत सुरू होते. या गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. पहाटेपासूनच शहरातील विविध बौद्ध विहारांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. अनुयायांनी विहारांमध्ये जाऊन वंदना घेतली. त्यानंतर घराघरांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.शेजाऱ्यापाजाऱ्यांना आणि मित्रमंडळींना मिठाई देऊन जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावर्षी जयंतीनिमित्त केवळ मिरवणुकाच नव्हे, तर सामाजिक कार्यावरही भर देण्यात आला होता. कडाक्याच्या उन्हाचा विचार करून अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि मंडळांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तसेच शहरात ठिकठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम राबवण्यात आले, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनुयायांसाठीही ही सोय अत्यंत उपयुक्त ठरली. दुपारी ४ वाजेनंतर शहरातील उत्सवाचे स्वरूप अधिकच भव्य झाले. शहराच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा सर्व भागांतून लहान-मोठ्या मिरवणुका निघण्यास सुरुवात झाली. या सर्व मिरवणुका हळूहळू मुख्य पुतळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. विद्युत रोषणाई, डीजेचा कडकडाट आणि ढोल-ताशांच्या गजरात भीम अनुयायी बेभान होऊन नाचत होते. आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या आणि अनेक मंडळांच्या मिरवणुका मध्यरात्रीपर्यंत पुतळा परिसरात पोहोचण्याची शक्यता आहे. जयंती उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. विशेषतः ग्रामीण भागातून नागरिक साहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नांदेडला येत असल्याने शहरात गर्दीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, शांततामय मार्गाने आणि शिस्तीत हा उत्सव वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर सुद्धा सुरु होता. एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती नांदेड शहरात अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरी झाली, ज्यामध्ये प्रत्येक भीम अनुयायाचा सहभाग लक्षणीय होता.सर्व जाती धर्माच्या भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार भारत आणि भारताबाहेर राहणारे सर्व जगातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभकामना प्रेषित करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 566 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त हुमाँयू कबीरने सांगितले स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ खरा