इस्लापूर पोलिसांची धडक कारवाई; १.३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इस्लापूर पोलिसांनी धडक कारवाई करत १ लाख ३४ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जुलै रोजी इस्लापूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हुंडी ते तोटंबा मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी रॉयल एनफिल्ड (MH-26-DB-1374) मोटारसायकलवरून विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत आरोपी दीपक गणेश आलडवाड (वय ३०, रा. किनवट) याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा ५४ हजार ८८२ रुपयांचा माल तसेच ८० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड मोटारसायकल असा एकूण १ लाख ३४ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. जाधवर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कागणे तसेच पोलीस कर्मचारी नागरगोजे, साखरे आणि इस्लापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले असून अशा बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!