नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला, तर हदगाव येथे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाक दाखवून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराचे कुलूप तोडून एक लाखांचा ऐवज लंपास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योतिबानगर, फिर्यादीचे राहते घर, तरोडा बु. नांदेड येथे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विजय एकनाथ पाटील (वय 56, रा. ज्योतिबानगर, तरोडा बु., नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुरनं. 651/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोउपनि. वाडेवाले करीत आहेत. हदगावमध्ये चाकूचा धाक दाखवून एक लाखांची लूट दुसरी घटना हदगाव तालुक्यातील वाटेगाव रोडवर 6 नोव्हेंबर रोजी रात्री 8.05 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी कल्याण विलासराव जाधव (वय 38, रा. वाटेगाव, ता. हदगाव) हे मोटारसायकलवरून जात असताना तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या प्रकरणी कल्याण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुरनं. 349/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 304(2), 126(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बर्गे करीत आहेत. घरफोडी आणि रस्त्यावरील लुटमारीच्या या दोन घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अज्ञात चोरट्यांचा आणि लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 134 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोळेगाव शिवारात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांचा छापा; ९ जणांविरुद्ध गुन्हा