१ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन मोटारसायकलींचा समावेश देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर उपविभागीय पोलीस पथकाने गवंडगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, तीन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना गवंडगाव शिवारात काही जण बेकायदेशीररीत्या तिरट जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी विजय संग्राम जाधव (वय ५२), धोंडीबा राणबा सोनतोडे (वय ५६), माधव मारोती वाघमारे, बालाजी शेषेराव खानापुरे, संजय देवराव जाधव (सर्व रा. गवंडगाव, ता. देगलूर) यांच्यासह वसंत तुकाराम सोरटे आणि शहाजी यादवराव लुटे यांची नावे कारवाईत निष्पन्न झाली. यातील आरोपी क्रमांक ३ ते ७ फरार असल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पंचांसमक्ष २ हजार १०० रुपये रोख रक्कम, १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ तसेच सगरोळीकर, माधव मरगेगाड आणि देगलूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंद्या विरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 128 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर-वसमत महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू