नांदेड (प्रतिनिधी) – डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे बहारदार संचलन आणि प्रख्यात गायिका मृदूला दाढे आणि अमोल चव्हाण यांच्या एकापेक्षा एक सरस गाण्याने आजची बंदाघाटवरील दिवाळी पहाट बहरली. तब्बल पंधरा हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. गुरुव्दारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समिती व अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेडच्या बंदाघाटवर सलग १४ व्या वर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम बहारदार झाला. पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच नांदेडचा बंदाघाट रसिकांच्या उपस्थितीने बहरुन गेला. सुरुवातीला नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील, आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा झाला. दुष्काळग्रस्तांसाठी यावेळी मदत निधी जमा करण्याचा संकल्प संयोजन समितीने सोडला. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचा नांदेडमध्ये दिवाळी पहाटचा हा २१ वा कार्यक्रम तर संयोजन समितीचा १४ वा कार्यक्रम होता. प्रख्यात गायिका मृदूला दाढे आणि अमोल चव्हाण मुंबईच्या या दोन्ही दिग्गज गायकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात घनश्याम सुंदरा या अमोल चव्हाणच्या गिताने झाली. त्यानंतर मृदूला दाढे यांनी ज्योती कलश झलके या गिताने कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर अमोल चव्हाण यांनी तुझे गीत गाण्यासाठी, अभिर गुलाल, चंद्र आहे साक्षीला आणि पांडूरंगावरची गाणी गावून या कार्यक्रमात रंगत आणली. आपल्या गाण्यात मृदूला दाढे यांनी वेगवेगळ्या गाण्यांच्या संदर्भाचा आलेख सादर करत त्यांची गाणी बहारदार केली. धुंदी कळ्यांना, शुक्रतारा या द्वंद गिताने बहार आणली. जीवनात हि घडी अशीच राहू दे हे गाणेही मृदूला दाढे यांनी उत्कृष्ट पध्दतीने सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर तुम्हावर केली मी मर्जी बहाल, सुनो सजना पपीहेने, तुझसे नाराज नही, छोड दे सारी दुनिया आणि एक गझल मेडली सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचा समारोप त्यांनी वंदेमातरमच्या गिताने केला. या कार्यक्रमाला संगीतसाथ सांगलीच्या अविनाश इनामदार, राम चौगुले आणि विनोद सावंत यांनी केली. गट्टानी साऊंडच्या बहारदार नियोजनाने या कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंतनू डोईफोडे, अॅड.गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, लक्ष्मण संगेवार, विजय होकर्णे, पुरुषोत्तम जोशी, विजय बंडेवार, सुरेश जोंधळे,उमाकांत जोशी, अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आनंद जवादवार, गिरीश देशमुख आदी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महापौर कविता मुळे, आमदार आनंदराव बोंढारकर, संतोष मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्या सकाळी साडेपाच वाजता पत्रकार विजय जोशी निर्मित ऋतुचे रंग सणाचे तरंग हा गुढीपासून ते होळीपर्यंत उत्सवाची स्वर यात्रा असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन बापू दासरी करणार असून, कार्यक्रमाची संकल्पना अॅड.गजानन पिंपरखेडे यांची आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण स्टार प्रवाहची छोटे उस्ताद लिट्स चॅम्प वीरा हाक्के ही राहणार आहे तर डॉ.प्रमोद देशपांडे यांची संगीत संयोजन असणार आहे. या कार्यक्रमात प्रख्यात गायक अमोल मालेगावकर, माधुरी पाटील वाकोडकर, उन्मणी डुघरेकर (बोरीकर), अभिनव पाटील, गणेश हाके आणि विजय बंडेवार हे विविध गिते सादर करणार आहेत. संगीताची साथ गजानन कुलकर्णी, कृष्णा बोंम्पीलवार, गौतम डावरे, राज लांबटिळे, रविराज भद्रे यांची असणार आहे. विजय जोशी, गजानन पिंपरखेडे यांनी मागच्या तेरा वर्षात पंचकन्या, माहेर घरच्या लेकी, राम प्रहर, गीतगंद, धुंदी कळ्यांना वसंत बहार, ग.दि.मा एक गीत यात्री, र्हदयसंगम, रुपेरी सोनसळा असे आगळेवेगळे कार्यक्रम सादर केले आहेत. दरवेळी वेगवेगळी संकल्पना घेवून या कार्यक्रमाची निर्मिती केली जाते. यावर्षी उद्या दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता ऋतुचे रंग, सणांचे तरंग हा १४ वा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमास सर्व रसिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 23 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री आदिगुरु ग्रंथ साहिब जी ,श्री गुरु ग्रंथ साहिबजींची संपूर्णता व गुरु-ता-गद्दी