नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड तालुक्यातील मरळक आणि निळा परिसरात वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी व त्यांच्या जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे महावितरणकडून शेतकऱ्यांवर वीज चोरीचे आरोप केले जातात, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे स्वखर्चातून सुविधा उभारणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
नांदेड तालुक्यातील निळा उपकेंद्रांतर्गत मरळक रोडवरील शेतकरी नंदकुमार बनसोडे यांनी आपल्या शेतात शेतीसोबत शेळीपालन व कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. या व्यवसायासाठी सतत वीजपुरवठा आवश्यक असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांना उष्म्यापासून वाचवण्यासाठी तसेच रात्री प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनेल) उभारला.
मात्र, संबंधित लाईनमनकडून या डीपीचे काम पूर्ण करण्यात आले नसून ते अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आले आहे. याबाबत विचारणा केल्यावर “हे काम माझ्याकडे नाही, मरळ विभागाकडे आहे,” असे सांगण्यात येते, तर मरळ विभागाकडून “हे निळा विभागाचे काम आहे,” असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.
दरम्यान, रात्री वीज नसल्यामुळे जनावरांचे हाल होत असून, उष्णतेमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच उत्पादनावरही परिणाम होत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. स्वखर्चातून डीपी बसवूनही जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर शेतकऱ्यांनी नेमके काय करावे, असा सवाल नंदकुमार बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.
“जर रात्री वीजपुरवठा न झाल्यामुळे माझे नुकसान झाले, तर संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण असून, महावितरणने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
