५ ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला देवदर्शनासाठी जात असताना बसवेश्वर चौक, कॅनॉल रोड परिसरातून जात होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२०/२०२६, कलम ३०९(४) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांच्या पथकाने नांदेड शहरातील तब्बल १०० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानंतर आदर्श ऊर्फ कुणाल श्रीराम लालमे (वय १९, रा. विष्णुनगर, हनुमान मंदिराजवळ, नांदेड) याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचा साथीदार साईनाथ रमेश वाघमारे (वय २१, रा. हमालपुरा, विष्णुनगर, नांदेड) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने चोरीचे १० ग्रॅम सोन्याचे लगड आपल्या राहत्या घरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी ते सोने जप्त केले. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. तपासात ही मोटारसायकल शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपीने सांदीपाणी शाळेजवळ एका अल्पवयीन मुलीच्या कानातील बाली चोरी केल्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील गुन्ह्याचीही उकल झाली. याशिवाय आरोपीच्या घरातून जप्त केलेला लॅपटॉप हा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून चोरी केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे शिरवळ पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्याचीही उकल झाली.
या कारवाईमुळे भाग्यनगर पोलीस ठाण्यातील मंगळसूत्र चोरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील घरफोडी अशा तीन गुन्ह्यांचा छडा लागला असून, चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने संतोष तांबे, पोलीस निरीक्षक, भाग्यनगर आणि महेश माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार आणि सायबर सेलच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
