राज अपार्टमेंट परिसरात नळजोडणी करून नियमित पाणीपुरवठा व सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ करण्याची मागणी नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सोमेश्वर नगर, सिडको परिसरातील राज अपार्टमेंट ‘ई’ प्लॉट क्रमांक २०१ येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान दिगांबर कांगणे यांनी आपल्या परिसरातील पाणीटंचाई आणि रस्त्याच्या समस्येकडे नांदेड-वाघाळा महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परिसरात अद्याप नळाला पाणी सोडले जात नसल्याने तसेच नळजोडणीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कांगणे हे १०० टक्के दिव्यांग असून, ३० जुलै २००५ रोजी कर्तव्यावर असताना झालेल्या गंभीर अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अशा परिस्थितीत घरातील पाण्याची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे. त्यांच्या पत्नीला देखील पाणी आणण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. परिसरातील बोअरवेलची पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असून, सध्याच्या परिस्थितीत कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांना निवेदन देऊन राज अपार्टमेंट ‘ई’ परिसरात तात्काळ नळाची जोडणी करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वीही महानगरपालिका कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज व विनंत्या करण्यात आल्या असून, समाजमाध्यमे आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातूनही या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. एका १०० टक्के दिव्यांग सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा व रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 26 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा