नांदेड (जिमाका) – राज्यात पर्जन्याधारित शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याकरिता शासनाने अनुदान तत्वावर सुरू केलेल्या वैयक्तिक शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीमध्ये सन २०२६-२७ या वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये संरक्षित सिंचनाचा खात्री असणाऱ्या शेततळे घटकाकरिता भर देण्याच्या शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने वैयक्तिक शेततळे घटकाकरिता महा-डीबीटी पोर्टलवर प्रतीक्षा यादीत असणाऱ्या १०० टक्के अर्जांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ८७ हजार १७४ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली असून त्यामध्ये अनुसूचित जाती ३ हजार ९२५, अनुसूचित जमाती ५ हजार ३९७ तर इतर ७७ हजार 870 या प्रमाणे प्रवर्गनिहाय शेतकऱ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे की हमीपत्र (परिशिष्ट २), आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, शेतकऱ्यांनी सदर लघुसंदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत कागदपत्रे महा-डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रे अपलोड करताना ती सुस्पष्ट व अद्ययावत असावीत. जे शेतकरी विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करणार नाहीत त्यांची निवड रद्द होईल. पुढील प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे तसेच महा-डीबीटी पोर्टलद्वारे सूचित करण्यात येईल. निवड झाल्यानंतर व पूर्वसंमती मिळाल्यानंतर सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून शेततळे विहित वेळेत पूर्ण करणारे शेतकरी अनुदानास पात्र राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा जवळच्या कृषी विभागाच्या इतर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे कृषी आयुक्तालयाचे संचालक (मृसं व पाक्षेव्य) डॉ. मेघना केळकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवादातून खेत बचाओ अभियानाचा संदेश; मृदासंवर्धन आणि संतुलित खत वापरावर भर