वाजेगाव, लालवाडी, हिंजेगाव परिसरातील वीटभट्ट्यांमुळे भूजलसाठ्यावर मोठा ताण; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची नागरिकांची मागणी नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना शासन आणि प्रशासनाकडून पाणी वाचविण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करा, अनावश्यक पाणी उपसा टाळा, बोअरवेल खोदू नका आणि उपलब्ध पाणीसाठा जपून ठेवा, असे निर्देश दिले जात आहेत. मात्र, दुसरीकडे वाजेगाव, लालवाडी, हिंजेगाव आणि परिसरात वीटभट्ट्यांसाठी बोअरवेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील वीट उत्पादनासाठी दररोज जवळपास ३६ लाख लिटर पाणी वापरले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत असतानाही संबंधित वीटभट्ट्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे व्यावसायिक कारणांसाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा सुरू राहायचा, हा विरोधाभास संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बोअरवेल खोदण्यास प्रतिबंध आणि पाणीसाठा जपण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, वीटभट्ट्यांवरील अवाजवी पाणी उपसा सुरूच राहिला तर सर्वसामान्य नागरिकांनी पिण्याचे पाणी आणायचे कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वीटभट्ट्यांमधील उत्पादनासाठी भूजलाचा किती वापर होतो, त्यासाठी आवश्यक परवानग्या आहेत का आणि पाणी उपशाचे नियम पाळले जातात का, याची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. पाणी हे केवळ व्यावसायिक उत्पादनाचे साधन नसून जनतेच्या जगण्याचा आधार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वीटभट्ट्यांवरील अनियंत्रित पाणी उपशावर तातडीने निर्बंध घालावेत आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाण्याचे स्रोत आटण्याची वेळ आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजच पाण्याचा अपव्यय रोखणे गरजेचे आहे. Kanthak Suryatal Post Views: 213 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागाकडून शबरीमला यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय ऑपरेशन सिंदूरनंतर ४ विमाने गायब? आंतरराष्ट्रीय डायरेक्टरीचा धक्कादायक खुलासा आणि उत्तरहीन प्रश्न!