छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव; पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करणारे पत्रकार रशीद अजिज भाई फाजलानी यांना प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला आमदार विक्रम काळे, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक सलीम सारंग, सिनेअभिनेते अतुल मोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. याच मान्यवरांच्या हस्ते पत्रकार रशीद फाजलानी यांना राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकार रशीद फाजलानी यांनी किनवटसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी सहारा समय, स्वदेश न्यूज, लेमन न्यूज आणि देश न्यूज यांसारख्या नामांकित वृत्तवाहिन्यांसाठी काम केले आहे. तसेच नवभारत, लोकशाही वार्ता, दैनिक गावकरी आणि सामना यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला आहे. सध्या ते ‘मराठवाडा न्यूज’ या यूट्यूब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गुन्हेगारी, राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न, प्रशासकीय कारभार तसेच ग्रामीण भागातील विकासाच्या विविध विषयांवर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि जनतेच्या हक्कांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांची राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते झालेला हा सन्मान त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण गौरव मानला जात आहे. या पुरस्कारामुळे किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पत्रकारिता क्षेत्रातून रशीद फाजलानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारितेचा हा सन्मान निश्चितच नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. बातमीच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनलेल्या पत्रकाराच्या कार्याचा हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून ग्रामीण पत्रकारितेचा सन्मान आहे. Kanthak Suryatal Post Views: 44 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बालविवाहमुक्त नांदेडसाठी प्रशासनाचा निर्धार;एप्रिल २०२७ पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट; विविध विभागांतील चॅम्पियन्सना प्रशिक्षण