१० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त; चारचाकी, दोन दुचाकी आणि ११ मोबाईल पोलिसांच्या ताब्यात नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरालगतच्या कौठा-वसरणी शिवारातील एका शेतात सुरू असलेल्या जुगार-मन्ना अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १६ जणांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह एकूण १० लाख १७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २० नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला कौठा-वसरणी शिवारातील एका शेतात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. गट क्रमांक २-६६ मधील शेतात प्रदीप ऊर्फ सोहम रोहे हा आपल्या शेतातील मोकळ्या जागेत काही इसमांना एकत्र करून बदक छाप पत्त्यांवर पैशांची बाजी लावत ‘जुगार-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १६ जण जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. या कारवाईत प्रदीप ऊर्फ सोहम लालचंद रौत्रे (३८), शेख मोहसीन शेख बाबू (३२), सौरभ साहेबराव चौदंते (२५), शुभम राजसिंह चव्हाण (२६), अब्दुल सलाम अब्दुल समर (३५), कृष्णा रावसाहेब कदम (३५), सिद्धांत सागर यादव (३०), प्रवीण जुगलिकिशोर धूत (३७), अभिजीत अर्जुन औसेकर (२८), फिरोज खान वाहिद खान पठाण (३८), सुनील तापसिंह लाला (३०), सरताजसिंग अजितसिंग (३३), सय्यद हुसेन सय्यद युसूफ (३०), राजेश रामराव हांबर्ड (३९), नारायण बळीराम चिटलेवार (५२) आणि सतपालसिंग जसपालसिंग हांडी (३२) यांचा समावेश आहे. वाहने आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी घटनास्थळावरून फोर्ड फिगो कार (एमएच २० ईई १०७६) किंमत ४ लाख ५० हजार रुपये, दोन दुचाकी किंमत २ लाख १० हजार रुपये, विविध कंपन्यांचे ११ मोबाईल फोन किंमत ३ लाख ३५ हजार रुपये, रोख रक्कम व इतर साहित्य २२ हजार ४८० रुपये असा एकूण १० लाख १७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील, इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे आणि नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कपिल पाटील व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा अवैध हालचालींची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विश्वकर्मा मंदिर परिसरात घरफोडी; ३८ हजारांचा ऐवज लंपास