नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ८२ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोनखेड, रामतीर्थ आणि भाग्यनगर पोलिस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सोनखेड येथे सोलार पॅनलची केबल चोरी
सोनखेड परिसरातील पिंपरनवाडी शेतशिवारात २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते २५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने शेतातील सोलार पॅनलची सुमारे ७० हजार रुपये किमतीची केबल चोरून नेली. याप्रकरणी उदयराज पळदुराम कुमार (वय ३०, रा. सोनखेड) यांच्या तक्रारीवरून सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामतीर्थ बसस्थानकात दागिने व रोकड चोरी
रामतीर्थ बसस्थानक, नरसी ता. नायगाव येथे २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोकड असा ३८ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी उपा बाबुराव मिनकीकर (वय ५३, रा. मुकुंदनगर, देगलूर) यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
भाग्यनगरमध्ये दुकान फोडून २.०४ लाखांचा ऐवज चोरीला
भाग्यनगर येथील श्री शिवशंकर मल्टीसर्व्हिसेस अँड फोटो स्टुडिओ या दुकानाचे २४ ऑगस्ट रात्री १० ते २५ ऑगस्ट सकाळी ९.३० वाजेदरम्यान कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सोनी, कॅनन कंपनीचे कॅमेरे, लेन्स, चांदीचे ब्रेसलेट, रोकड व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी योगेश गंगाधर मळेकाळे (वय २४, रा. विष्णुनगर, नांदेड) यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७८/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन्ही घटनांतील अज्ञात चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
