अस्तोदय या नाटकाने पहिल्याच दिवशी दिला देहदानाचा संदेश ;आज गर्भ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कालपासून गुरुवार दि. १९ नोव्हेंबरपासून नांदेड येथे सुरुवात झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून नांदेडकर रसिकांना पहिल्याच दिवशी अस्तोदय या नाटकाच्या माध्यमातून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या देहदानाचा संदेश नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला.

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला अधोरेखित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या उदघाटनासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद नांदेड केंद्राच्या अध्यक्षा सौ अपर्णा नेरलकर, जेष्ठ रंगकर्मी तथा नाट्य दिग्दर्शक श्री.रवी श्यामराज, लेखक तथा रंगकर्मी सुहास देशपांडे, परीक्षक श्री.दिलीप देवरणकर, श्री महेंद्र कुरधोडे आणि सौ विजया कुडव यांची उदघाटक म्हणून उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराजाचे पूजन करून शासनातर्फे सर्व मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

जेष्ठ रंगकर्मी रवी श्यामराज यांनी आपल्या मनोगतामध्ये नाटक हि केवळ एक कला नसून महाराष्ट्राला लौकिक प्राप्त करून देणारी दीर्घ परंपरा आहे असे नमूद केले तसेच महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय याचे सातत्याने दर्जेदार आयोजन करून नवीन कलाकार तथा रंगकर्मी घडविण्यास स्पर्धेच्या माध्यमातून  जे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे हि बाब प्रशंसनीय आहे असे मत व्यक्त केले.

मान्यवरांच्या मनोगतानंतर लगेचच राज्य नाट्य स्पर्धेतील अस्तोदय या पहिल्या नाटकाला सुरुवात करण्यात आली. कथानकाची सुरुवात होते ते एक सुखवस्तू घरापासून. आई बाबा दोन मुलं असं कुटुंब. सर्व कुटुंब लहान मुलीच्या जन्मापासून तिच्या हृदयात एक छिद्र असल्या कारणाने कायम तणावाखाली असते. मग डॉक्टर यावर उपाय सांगतात तो हार्ट ट्रान्सप्लांट चा. मात्र समाजात देहदानाची आणि अवयदानाची तेवढी जनजागृती नसल्यामुळे कुटुंब अति मानसिक विवंचनेत असते. अनेक प्रयत्न करूनही लहान मुलीच्या हार्ट ट्रांसप्लांट साठी कुणी अवयव दाता मिळत नसतो. लहान मुलगी आयुष्याच्या काही शेवटच्या घटिका मोजत असतांना अचानक पणे मोठी मुलगी प्रेरणा हिचा अपघात होतो आणि इथेच पहिला अंक संपतो.

नाटकाच्या दुसऱ्या अंकात स्मशान आणि स्मशानात असलेला मसणजोगी याच्या भोवती नाटकाचे कथानक फिरते. एकीकडे लहान मुलगी हृदयाच्या प्रतीक्षेत आपले काही क्षण जगात होती तर दुसरीकडे मोठी बहीण प्रेरणा अपघातामुळे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटिका मोजत होती. शेवटी कुटुंब प्रेरणाच्या अवयवदानाचा निर्णय घेते आणि तिच्या अवयवदानाच्या माध्यमातून तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचविण्यात यशस्वी होते. एकीकडे मोठ्या मुलीच्या जाण्याचे दुःख जरी असले तरी तिच्या अवयवदानामुळे लहान मुलीचे प्राण वाचले हि भावना कुटुंबाच्या मनात जागृत होते.

झपुरझा सोशल फाऊंडेशन परभणी निर्मित विनोद डावरे लिखित आणि भानुदास जोशी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकाने नाट्य रसिकांना केवळ नाट्य अनुभव नाही दिला तर घरी परततांना आपला जीव आपल्या मृत्यूनंतरही अवयव दान किंवा देह दानाच्या माध्यमातून किती उपयोगी आणि इतरांच्या जीवनात आनंद फुलवणारा आहे हा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला.

नांदेडकरांना अशीच दर्जेदार विविध नाटके ३ डिसेंबर पर्यंत पाहायला मिळणार आहेत. आज सायंकाळी ठीक ७ वाजता स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड निर्मित आणि दिनेश कवाडे लिखित आणि दिग्दर्शित गर्भ हे नाटक सादर होणार असून सर्व नाट्य रसिकांनी याचा भरभरून लाभ घ्यावा असे आव्हान सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!