नांदेड (प्रतिनिधी)- चारचाकी वाहनाच्या थकीत कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून सातत्याने फोन करून तगादा लावला जात असल्याने सिडको परिसरातील २८ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ ऑगस्ट) रात्री घडली. प्रबुद्ध अशोक मगरे असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तयार केलेल्या व्हिडिओत फायनान्स कंपनीच्या कथित त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
प्रबुद्धने २०२३ मध्ये पुणे येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या भूमकर चौक, वाकड शाखेतून कर्ज घेऊन मारुती स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली होती. सुरुवातीची जवळपास दोन वर्षे त्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र २०२५ मध्ये मुंबई-पुणे मार्गावर त्याच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात प्रबुद्ध बचावला; परंतु वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनधारकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करून गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाहनाचा विमा दावा करण्यात आला.
२०२६ मध्ये वाहनाची दुरुस्ती करण्यात आली. जवळपास नऊ महिने कार पुण्यातील गॅरेजमध्ये असल्याने या काळात प्रबुद्धचे उत्पन्नही बंद झाले. परिणामी कर्जाचे काही हप्ते थकीत झाले. थकीत रक्कम भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती त्याने पुण्यातील बाणेर येथील श्रीराम फायनान्सच्या शाखाधिकाऱ्यांकडे केल्याचे कुटुंबीय सांगतात.
मात्र तडजोडीनंतरही किमान दोन लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यास वाहन रस्त्यावरून ओढून नेण्यात येईल, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून कंपनीच्या प्रतिनिधींकडून मोबाईलवर वारंवार फोन करून थकीत रक्कम भरण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबीची शासकीय सुट्टी असतानाही सायंकाळी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रबुद्धला फोन आला. त्यावेळी त्याने गुरुवारी (२७ ऑगस्ट) पुण्यात येऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊ आणि पैसे भरून वाहन सोडवून घेऊ, असे सांगितल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतरही तगादा सुरू राहिल्याने प्रबुद्ध मानसिकदृष्ट्या खचला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी प्रबुद्धने स्वतःचा व्हिडिओ तयार करून फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या कथित तगाद्यामुळे आपण त्रस्त असल्याचे सांगितले आणि हा व्हिडिओ वडिलांना व्हॉट्सॲपवर पाठवला. त्यानंतर काही वेळातच त्याने राहत्या घरी गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रबुद्धला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, फायनान्स कंपनीकडून झालेला संपर्क आणि कर्जवसुलीची पद्धत यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
फायनान्स कंपनीच्या कथित तगाद्यामुळे एका तरुणाचा जीव गेला, असा कुटुंबीयांचा गंभीर आरोप असून, या आरोपांची पोलिस तपासातून सत्यता स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.
