मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेडच्या कलाकारांचा सहभाग; मराठी नाट्य व सांस्कृतिक चळवळीला मिळाली नवी उभारी नांदेड – संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय स्वप्नरंग नाट्य महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेड येथील नामांकित नाट्यसंस्था व कलाकारांनी दर्जेदार नाट्यप्रयोग सादर करत नाट्यरसिकांची मने जिंकली. महोत्सवात विविध आशयघन नाटके, दीर्घांक, एकांकिका आणि एकपात्री प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण झाले. प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवामुळे नांदेडमधील नाट्यप्रेमींना वैविध्यपूर्ण रंगकृतींचा दर्जेदार आस्वाद घेण्याची संधी मिळाली. महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांतील लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि नाट्यसंस्था एकाच व्यासपीठावर आल्या. त्यामुळे परस्पर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि नव्या कलात्मक संकल्पनांना चालना मिळाली. अशा उपक्रमांमुळे मराठी नाट्य चळवळीला बळ मिळण्यासोबतच सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होत असल्याची भावना उपस्थित रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी व्यक्त केली. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महोत्सव समन्वयक सुधांशू सामलेट्टी यांच्यासह गौतम गायकवाड, शांती देसाई, किरण टाकळे, संदेश महाबळे, नागेश डोईबळे, स्वरा देशमुख आणि मुरलीधर हांबर्डे यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहभागी नाट्यसंस्था, कलाकार, स्वयंसेवक, प्रसारमाध्यमे आणि नाट्यरसिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश कवडे यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातही अशाच दर्जेदार नाट्य महोत्सवांचे सातत्य राखून नांदेडच्या नाट्य व सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 351 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कै. सुजय सकपाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ९ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान, आरोग्य तपासणी व सन्मान सोहळा राष्ट्रीय नृत्य-संगीत स्पर्धा, भव्य आरोग्य शिबिर आणि तृतीयपंथी सक्षमीकरण परिषदेसह विविध उपक्रमांचे आयोजन