श्री गुरु नानक देव जी जयंती विशेष मानवजातीला प्रेम, सत्य, समानता, बंधुभाव, निस्वार्थ सेवा आणि परमात्म्याच्या स्मरणाचा मार्ग दाखवणारे श्री गुरु नानक देव जी हे केवळ एका धर्माचे संस्थापक नव्हते, तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या जीवनातून आणि विचारांतून माणसाला माणूस म्हणून जगण्याची खरी शिकवण दिली. त्यांच्या काळात समाज जात-पात, अंधश्रद्धा, धार्मिक भेदभाव, कर्मकांड आणि सामाजिक विषमतेने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी निर्भयपणे सत्याचा आवाज बुलंद केला आणि शिकवले — परमात्मा एक आहे, मानवजात एक आहे आणि प्रत्येक माणूस समान आदरास पात्र आहे. “एक ओंकार सतनाम, करता पुरख, निर्भउ, निर्वैर, अकाल मूरत, अजूनी, सैभं, गुर प्रसाद.” परमात्मा एक आहे, तो सत्यस्वरूप, संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता, निर्भय, निर्वैर, जन्म-मृत्यूच्या बंधनापलीकडे असणारा, स्वयंप्रकाशित आणि सर्वत्र व्याप्त आहे. परमात्मा कोणत्याही एका ठिकाणी, धर्मात किंवा व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण सृष्टीमध्ये त्याचे अस्तित्व आहे. त्याला जाणण्यासाठी बाह्य दिखावा नव्हे, तर निर्मळ मन, नामस्मरण, सत्य आचरण आणि सद्गुरूंच्या शिकवणीची आवश्यकता आहे. “ना को बैरी, ना बिगाना, सगल संग हम कऊ बन आई।” अर्थात, कोणीही आपला शत्रू नाही, कोणी परका नाही; संपूर्ण मानवजातीशी आपले प्रेमाचे नाते आहे. गुरु नानक देव जी यांच्या जीवनातील सच्चा सौदा हा प्रसंग आजही प्रत्येकाला अंतर्मुख करतो. व्यापारासाठी दिलेल्या पैशातून भुकेल्या लोकांना भोजन देऊन त्यांनी शिकवले की गरजूंची मदत करणे आणि मानवतेची सेवा करणे हाच खरा नफा आहे. त्यांच्या शिकवणीतून नाम जपो, किरत करो, वंड के छको — परमात्म्याचे स्मरण करा, प्रामाणिक मेहनत करा आणि मिळालेल्या कमाईतून इतरांसोबत वाटून घ्या — हा जीवनाचा सुंदर मार्ग मिळतो. त्यांनी स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले. जात-पात न मानता सर्वांना एकत्र बसून भोजन करण्याची लंगर परंपरा सुरू करून समानतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर ठेवला. निसर्गाबद्दलही त्यांचे विचार अत्यंत दूरदृष्टीचे होते — “पवन गुरु, पाणी पिता, माता धरत महत.” हवा गुरु, पाणी पिता आणि पृथ्वी माता आहे; निसर्गाचा आदर व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आज माणूस पैसा कमावतो, परंतु मनःशांती हरवतो; नाती जोडतो, परंतु प्रेम आणि विश्वास कमी होतो. अशा काळात गुरु नानक देव जी यांची शिकवण अधिक महत्त्वाची आहे. दुसऱ्याला दुःख देण्याऐवजी आधार द्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, अहंकार सोडा, मेहनतीने जगा, परमात्म्याचे स्मरण करा आणि आपल्या जीवनाचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करा. गुरु नानक देव जी यांची जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आपल्या मनातील द्वेष मिटवून प्रेम, सत्य, सेवा, परमात्म्याचे स्मरण आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करण्याचा दिवस आहे. त्यांच्या शिकवणीचा एक विचार जरी आपण आपल्या जीवनात आचरणात आणला, तरी आपले जीवन आणि समाज अधिक सुंदर होऊ शकतो. श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पवित्र शिकवणीने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सद्बुद्धी, प्रेम, परमात्म्यावरील श्रद्धा आणि मानवतेची भावना निर्माण होवो. गुरु नानक नाम, चढदी कला, तेरे भाणे सरबत का भला! – राजेंद्र सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर, नांदेड 7700063999 Kanthak Suryatal Post Views: 158 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये आजपासून रंगणार मराठी नाट्य स्पर्धेचा महाउत्सव! ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उत्साहात उदघाटन