लेखक – राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
नांदेड हे केवळ महाराष्ट्रातील एक शहर नाही, तर इतिहास, श्रद्धा, सेवा आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे केंद्र आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि तख्त सचखंड श्री हुजूर साहिब या जगप्रसिद्ध शीख तीर्थस्थानामुळे नांदेडला आंतरराष्ट्रीय ओळख लाभली आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे नांदेडचा विकास हा केवळ स्थानिक नागरिकांचा विषय नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा विषय आहे.
मात्र, या ऐतिहासिक शहराकडे पाहताना एक वेदनादायी वास्तवही समोर येते. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असला, तरी अनेक मूलभूत नागरी प्रश्न आजही कायम आहेत. अनेक भागांतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, काही रस्त्यांचे काम पूर्ण होताच पुन्हा खोदकाम सुरू होते, वाहतूक कोंडी वाढत आहे, अपघातांची संख्या चिंताजनक आहे, पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही, सार्वजनिक शौचालयांची कमतरता आहे आणि काही भागांमध्ये वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने मांडत आहेत.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही काही प्रश्न गांभीर्याने विचारात घेण्याची आवश्यकता आहे. तख्त सचखंड श्री हुजूर साहिबसह हीराघाट गुरुद्वारा, माता साहिब गुरुद्वारा, शिकारघाट गुरुद्वारा, संगत साहिब गुरुद्वारा आणि इतर ऐतिहासिक गुरुद्वाऱ्यांकडे जाणाऱ्या अनेक मार्गांची अवस्था समाधानकारक नसल्याची भावना भाविक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करतात. अशा पवित्र स्थळांकडे जाणारे रस्ते, प्रकाशव्यवस्था, स्वच्छता, दिशादर्शक फलक आणि वाहतूक व्यवस्था जागतिक दर्जाची असणे अपेक्षित आहे.
विशेषतः माता साहिब गुरुद्वारा मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी वाहतूक कोंडी, धूळ, अपघाताचा धोका आणि नागरिकांचा वेळ व इंधन यांचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे, शहरातील काही नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलांच्या गुणवत्तेबाबतही वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलाच्या काही भागांतील काँक्रीट गळून पडल्याच्या घटना समोर आल्याने सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत स्वतंत्र तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
नांदेडच्या विकासासाठी सचखंड गुरुद्वारा बोर्डाने समाजहिताच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान जमिनी शासन आणि विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिल्या. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, उद्याने, स्टेडियम, रस्ते आणि सार्वजनिक सुविधा विकसित व्हाव्यात हा त्यामागील मूळ उद्देश होता.
मात्र, अनेक नागरिक आणि स्थानिक शीख समाजाची भावना आहे की काही ठिकाणी या जमिनींचा वापर मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या प्रकारे होत आहे. उदाहरणार्थ, नागरिकांच्या उपयोगासाठी उद्यान व व्यायामशाळेसाठी राखीव असलेल्या नंदीग्राम मार्केट परिसरात दुकाने उभारून त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे सांगितले जाते. तसेच महाराजा रणजित सिंघ जी मार्केट परिसरातील बदलांमुळे पूर्वी उपलब्ध असलेल्या कमी खर्चातील सार्वजनिक सुविधांवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त केली जाते. त्यामुळे समाजहितासाठी देण्यात आलेल्या जमिनींचा वापर मूळ उद्देशानुसार होत आहे का, याचे पारदर्शक पुनरावलोकन करण्याची मागणी होत आहे.
आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही सुधारणा अपेक्षित आहे. श्री गुरु गोबिंद सिंघ जी रुग्णालयासह काही शासकीय रुग्णालयांमध्ये वेळेवर उपचार, औषधांचा पुरवठा, आधुनिक यंत्रसामग्री आणि रुग्णसेवेत अधिक सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उद्याने, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक विरंगुळ्याच्या जागांचीही कमतरता जाणवते.
यासोबतच वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वाढता प्रभाव आणि त्यात अडकणारी तरुण पिढी ही चिंतेची बाब आहे. समाजात वाढत असलेला मानसिक ताणही दुर्लक्षित करता येणार नाही. अलीकडील काळात एका शिक्षकाने वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासामुळे आपल्या दोन लहान मुलांसह वाहनासकट पुलावरून उडी घेतल्याची बातमी संपूर्ण समाजाला हादरवून गेली. अशा घटना केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून मानसिक आरोग्य, कार्यस्थळी वातावरण आणि सामाजिक आधारव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
गेल्या सुमारे पंचवीस वर्षांपासून सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डावर सरकारी प्रशासक कार्यरत आहे. स्थानिक शीख समाजाचे म्हणणे आहे की गुरुद्वारा व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना स्थानिक शीख समाज, पंज प्यारे साहिबान आणि स्थानिक जाणकारांचा अधिक प्रभावी सहभाग असावा. यासंदर्भात अनेक निवेदने, आंदोलने आणि लोकप्रतिनिधींमार्फत मागण्या करण्यात आल्याचे समाजाचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या मनातील आणखी एक प्रश्न म्हणजे सार्वजनिक प्रश्नांवरील प्रतिसाद. अनेकदा लोकप्रतिनिधी पाहणी करतात, आश्वासने देतात, पत्रकार परिषदाही होतात; मात्र अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच राहतात. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, वेळेत कामांची पूर्तता आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे.
नांदेडचा नागरिक शांत आहे; परंतु ही शांतता समाधानाची नाही, तर अपेक्षांची आहे. या शहराला केवळ नवीन इमारती किंवा प्रकल्पांची गरज नाही. दर्जेदार रस्ते, सुरक्षित पूल, सुयोग्य वाहतूक, सक्षम आरोग्य व्यवस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण, धार्मिक पर्यटनाला साजेशा सुविधा, पारदर्शक प्रशासन, धार्मिक संस्थांच्या मूळ उद्देशाचा सन्मान आणि नागरिककेंद्री विकास यांची आवश्यकता आहे.
नांदेड हा इतिहास, श्रद्धा आणि सेवेचा वारसा लाभलेला शहर आहे. या वारशाला साजेसा विकास घडविणे ही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विकास हा केवळ खर्च झालेल्या निधीतून नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलातून मोजला गेला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करणे ही टीका नसून, नांदेडच्या उज्ज्वल भविष्यासाठीची विधायक भूमिका आहे.
– राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
प्रोफेशनल इलेक्ट्रिकल ट्रेनर, नांदेड
मो. 7700063999
