- बदर समितीचा अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारद्वारा प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडात उद्या, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या महामोर्चात सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारने बदर समितीचा अहवाल अधिकृतरीत्या तातडीने सार्वजनिक करावा, तसेच जातनिहाय जनगणना पूर्ण होईपर्यंत अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.
यासोबतच अनुसूचित जातींच्या आरक्षणातील रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरण्यात यावा, आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या परीक्षार्थींना खुल्या संवर्गातील जागांवरही गुणवत्तेच्या आधारे संधी मिळावी आणि अनुसूचित जातींसाठी मंजूर करण्यात आलेला निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये, या मागण्याही करण्यात येणार आहेत.
या महामोर्चात बुद्धिजीवी, आंबेडकरवादी, बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, भंगी, बुरुड यांसह अनुसूचित जातीतील विविध ५९ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन आंबेडकरवादी नेते प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
