नांदेड (प्रतिनिधी) – यांत्रिक युगात मानवी बुद्धीचे महत्त्व अढळ ठेवत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून पत्रकारितेच्या भविष्याचा शोध घेणारी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संपन्न झाली. आजच्या पत्रकारितेतील एआयचे योगदान सुखद की दुखद? या विषयावर आयोजित या कार्यशाळेत तंत्रज्ञानाचा आशावादी दृष्टिकोन मांडतानाच पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांवरही चिंतन करण्यात आले. भविष्यात एआयपेक्षाही अधिक सामर्थ्यवान तंत्रज्ञान उदयास येण्याची शक्यता लक्षात घेता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची नितांत आवश्यकता या वेळी अधोरेखित करण्यात आली.* विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या एआय कार्यशाळेच्या व्यासपीठावर प्र-कुलगुरू अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक डॉ. श्रीराम पवार (दैनिक सकाळ), नंदकिशोर पाटील (दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगर), प्रियदर्शनी हिंगे (संचालिका, मॅक्स उमन चॅलन), फराह खान (न्यूज 18, मुंबई), संतोष शालीग्राम (विभागीय संपादक, दैनिक सकाळ, छत्रपती संभाजीनगर) आणि डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी (संचालक, आयक्यूएसी) यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, माध्यम शास्त्र संकुलाचे डॉ. सुहास पाठक आणि आयक्यूएसी चे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी केले. नांदेड शहरातील अनेक पत्रकार, विद्यार्थी आणि संशोधक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. एआय हे साधन, बुद्धी माणसाचीच याप्रसंगी बोलताना फराह खान यांनी एआय तंत्रज्ञानाला आधुनिक क्रांतीचे प्रतीक म्हटले. कॉपीपेस्टच्या जमान्यातील गोंधळ एआयमुळे कमी होऊ शकतो. भाषांतर सहज शक्य होते, भाषेतील त्रुटी दूर होतात. इतिहासाचा संदर्भ घेता येतो. मात्र या सर्व प्रक्रियेत माणसाने एआयला काय विचारावे हे महत्त्वाचे आहे. आपल्या मागणीप्रमाणेच एआय आपल्याला उत्तर देतो. एआयमुळे पत्रकारांच्या नोकऱ्या जातील, ही भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण बातमी ही माणसाच्या बुद्धीने तयार होते, ती बुद्धी एआयकडे नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याची क्षमता आजच्या पत्रकाराची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पत्रकार म्हणजे बातमीची जननी नंदकिशोर पाटील यांनी पत्रकारितेची व्याख्या करताना सांगितले की, आधुनिक पत्रकारिता मधील ‘आधु’ आणि ‘निक’ असे दोन प्रवाह आहेत. हातात मोबाईल असलेला प्रत्येकजण पत्रकार झाला असला, तरी पत्रकारितेची मातृत्वाशी उपमा देत ते म्हणाले, एआय आईची जागा घेऊ शकत नाही. जशी आई बालकाला जन्म देते, तशीच बातमीचा जन्म पत्रकार देतो. आपण खरेच बाळशास्त्री जांभेकरांचे वारस असू, तर दर्पण चा वारसा जपला पाहिजे. पत्रकारांनी केलेल्या चुकांबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्ही एस.टी. महामंडळाला बदनाम केले आणि ग्रामीण भागातील सरकारी वैद्यकीय सेवांवर अन्याय केला. आम्ही नकारात्मक बातम्यांनाच प्राधान्य दिल्याने शासनानेही या सेवांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. ब्रेकिंग न्यूजची मक्तेदारी वृत्तवाहिन्यांची राहिलेली नाही. अहमदाबाद आणि बारामती विमान अपघाताच्या घटना सांगताना ते म्हणाले की, या घटनांचे खरे फुटेज काढणाऱ्या छोट्या बालक आणि बालिकेने आपल्या मालकी हक्कासाठी दाद मागितली असती, तर ते दोघे अब्जाधीश झाले असते. लाडकी बहीण योजनेबाबतही ऑपरेटरच्या चुकीच्या वृत्तामुळे गैरसमज पसरवला गेला. सत्याची भीती जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना वाटत राहील, तोपर्यंत पत्रकारिता जिवंत राहील. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हेच यशाचे गमक प्रियदर्शनी हिंगे यांनी तंत्रज्ञान हे शक्तीचे साधन असल्याचे सांगताना ग्रामीण भागात ते पोहोचविण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे मत व्यक्त केले. महिलांविरुद्ध एआयच्या माध्यमातून झालेल्या दुष्परिणामांची उदाहरणे देताना त्यांनी असा सूर काढला की, वापरकर्त्याची मानसिकता शुद्ध असेल, तर तंत्रज्ञानाचा वापरही सकारात्मक आणि प्रभावी ठरू शकतो. शिक्षण क्षेत्राला उंचावण्यासाठी पत्रकारांची जबाबदारी डॉ. बी. सुरेंद्र रेड्डी यांनी डिजिटल सादरीकरणाद्वारे एआयचा वापर कसा करावा, कोणती ॲप्लिकेशन्स वापरावीत, याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कामगिरीची बातमी जनसामान्यांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक क्षेत्राला सुदृढ करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. स्वारातीम हे ३० वर्षांचे विद्यापीठ असूनही आम्ही ११० वर्षांच्या उस्मानिया विद्यापीठाला सॉफ्टवेअर पुरवीत आहोत. आम्ही विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार करून देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रकारितेची व्याख्या बदलायची, मूल्ये नाही डॉ. श्रीराम पवार यांनी पत्रकारितेच्या व्याख्येवर प्रकाश टाकताना सांगितले की, बातमी, विश्लेषण आणि भविष्यवेध ही खरी पत्रकारिता आहे. काय घडले, त्याचे विश्लेषण काय, आणि त्यातून पुढे काय घडेल, हे सांगणे म्हणजे पत्रकारिता. गेल्या तीस वर्षांत पत्रकारिता ध्येयवेडी ते व्यावसायिक आणि आता धंदेवाईक झाली आहे. पत्रकारांनी मूळ गाभा कधीही न विसरता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पद्धतीने बातम्या सादर कराव्या लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशाल पाटील यांनी एआय अँकरमध्ये संवेदनशीलता नसल्याने पत्रकारांनी मानवी जाणीवा जागृत ठेवून पत्रकारिता करण्याचा सल्ला दिला. संतोष शालीग्राम यांनी एआय टूल्सचा वापर करून वर्तमानपत्रात नाविन्य कसे आणता येईल, याचा अनुभव सांगितला. नरेंद्र चव्हाण यांनी दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये एआयचा सकारात्मक वापर कसा करता येईल, हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गोणारकर यांनी केले. या कार्यशाळेच्या निमित्ताने एकच सूर स्पष्ट झाला की, एआय हे केवळ एक साधन आहे. त्याचा उपयोग करायचा की गैरउपयोग, हे पत्रकाराच्या बुद्धीवर, प्रामाणिकपणावर आणि संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी मानवी विचारांची आणि सत्यशोधनाची भूक हीच खऱ्या पत्रकारितेची प्रेरणा राहील, असा संदेश या कार्यशाळेने दिला. Kanthak Suryatal Post Views: 693 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड महानगरपालिकामध्ये लिपिक सांभाळतोय जनसंपर्क अधिकाऱ्यांचा कारभार! दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन