नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे, माध्यमांशी संवाद साधणारे आणि महापालिकेची अधिकृत भूमिका स्पष्ट करणारे जनसंपर्क विभाग सध्या स्वतःच जनसंपर्क विना असल्याचे चित्र आहे. आश्चर्य म्हणजे, जनसंपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी थेट एका लिपिकावर सोपवण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारीची अपेक्षा असताना, अधिकृत पदावर नियुक्ती न करता तात्पुरत्या स्वरूपात कारभार चालवला जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनसंपर्क अधिकाऱ्यांचे पद रिक्त असताना त्यावर कायमस्वरूपी नियुक्ती का करण्यात आलेली नाही? संबंधित विभागाकडे पात्र अधिकारी उपलब्ध नाहीत का? की हा तात्पुरता प्रयोगच कायमस्वरूपी बनवण्याचा प्रयत्न आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत. शहरात विविध विकासकामे, निविदा प्रक्रिया, कर वसुली, आरोग्य मोहिमा यासारख्या संवेदनशील विषयांवर माध्यमांना अधिकृत माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अधिकृत पदाधिकाऱ्याऐवजी लिपिकाकडून ही जबाबदारी पार पाडली जात असल्याने माहितीच्या विश्वसनीयतेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या मते, काम सुरळीत सुरू असले तरी जबाबदारीची साखळी स्पष्ट नसल्याने निर्णय प्रक्रियेत गोंधळ उडू शकतो. तर नागरिकांचा प्रश्न आहे जर जनसंपर्क विभागच इनचार्ज वर चालत असेल, तर शहराच्या प्रशासनाची दिशा कोण ठरवणार? दरम्यान, या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या महापालिकेने जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणारा विभागच प्रश्नांकित आता तरी प्रशासन जागे होणार का? Kanthak Suryatal Post Views: 1,030 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्लास्टिक नको, पृथ्वी निवडा ; नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक जनजागृती संवाद विकासाचा: एआयच्या युगात पत्रकारितेचे आव्हान आणि संधी