नांदेड(प्रतिनिधी)-30 जुलै रोजी शतपावली करणाऱ्या महिलेचे दागिणे बळजबरीने चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास चोरी गेलेला ऐवज 100 टक्के जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली. या पत्रकार परिषदेत विमानतळचे पोलीस निरिक्षक सितांबर कामठेवाड यांच्यासह त्यांचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जुलै रोजी उर्मिला लक्ष्मणराव सोनटक्के या रात्री 9 वाजता आपल्या मुलीसोबत शतपावली करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन चोरून नेली होती. त्या प्रमाणे गुन्हा क्रमांक 289/2025 दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करतांना विमानतळचे पोलीस निरिक्षक सितांबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, शेख शोयब, राजेश माने, पाकलवाड, वाडकर, नंदगावे यांनी बबन महेश देवकत्ते (26) रा.अंबानगर सांगवी, सय्यद जाकेर सय्यद जफर (28) रा.महेबुबनगर नांदेड या दोघांना पकडले. पोलीस कोठडी दरम्यान या दोघांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच एकूण 4 गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे पाच गुन्हे केलेले आहेत. त्यांनी या पाच चोरीच्या घटनांमध्ये चोरलेला ऐवज 100 टक्के जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या दोघांकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
आयटीआयचे प्रकरण किचकट
चोरीच्या विषयाची पत्रकार परिषद संपल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने पोलीस अधिक्षकांना आयटीआय जवळील जमीनीच्या ताबा प्रकरणात विचारले असतांना हे प्रकरण अत्यंत किचकट असल्याचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सांगितले. पण त्यावेळी तेथे पोलीस होते. याबद्दल मौन बाळगले. तसेच हे प्रकरण सीव्हील आहे असेही सांगितले. आम्ही यात हस्तक्षेप केला तर कोर्टाचा अवमान होईल असे सांगितले. पण पोलीसांच्या उपस्थितीत हा कब्जा बदलण्याचा प्रकार झाला याबद्दल मात्र मौन बाळगले. सध्या हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस उपअधिक्षकांकडे आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांची बदली झाली आहे. नवीन पोलीस उपअधिक्षक आल्यावर या प्रकरणाचा तपास पुढे होईल हेही सांगितले. परंतू त्या जागेत बांधकाम झाले तर काय? हा प्रश्न पोलीस अधिक्षकांच्या उत्तराने समोर आला आहे.

