नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा अवघ्या दहा दिवसांत पंजाब राज्यातून सुखरूप शोध लावला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजपूर (पंजाब) येथील अल्पवयीन मुलगी 4 जुलै 2026 रोजी नांदेड येथे दर्शनासाठी आली असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 336/2026 दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व विविध माध्यमांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यातील दोदरा, ता. समाना येथे मुलीचा शोध घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले. चौकशीअंती जसपालसिंह उर्फ अवतारसिंह (वय 23, रा. दोदरा, ता. समाना, जि. पटियाला, पंजाब) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये पुढील कारवाई करण्यात आली. मुलीला आवश्यक संरक्षण देऊन बालसुधारगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर पोलिसांच्या सहकार्याने पार पडली. हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या बालकांच्या शोधासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,056 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सायबर फसवणुकीसह तीन ठिकाणी गुन्हे; तब्बल 19.41 लाखांचा ऑनलाईन गंडा रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त