या आधुनिक युगात, जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसिद्धी आणि शक्तीला देवत्व समजले जाते, तिथे खरे देवत्व हरवून जाते. एक काळ असा होता की लोक देव म्हणून मानवाच्या रूपातील सत्पुरुषांना मानायचे. पण आज त्या देवतेचे अस्तित्व हरवले आहे. मी एक अनुभव जगलो,एका जिवंत देवाला पाहिलं, आणि त्यालाच हळूहळू मरणाताना पाहिलं.
तो एक अधिकारी होता – देवमाणूस
शासनात उच्च पदावर असलेला तो अधिकारी, केवळ अधिकाराने नाही, तर त्याच्या ज्ञानाने, कार्यकुशलतेने आणि लोकांसाठी असलेल्या सेवाभावामुळे लोकांच्या मनात देवासारखा घर करून होता. त्याच्या एक हस्ताक्षराने आयुष्य बदलत असे, त्याच्या एका आदेशाने लोकांचे प्रश्न सुटत. गरीबांच्या डोळ्यात आशा, तर अमानवी संकटांत सापडलेल्या जनतेसाठी तो एकमात्र मार्ग होता.
मी त्याच्यासोबत काम करत होतो, सहकारी नव्हे, तर शिष्यासारखा. मी त्याला केवळ अधिकारी म्हणून नाही तर देव म्हणून पाहिलं होतं. त्याच्या प्रत्येक कृतीत मला करुणा, न्याय आणि ज्ञानाचा संगम दिसायचा.पण हळूहळू माझा भ्रम निरास झाला.
माझ्या देवाचा अधोगतीचा आरंभ…
पण काळाच्या ओघात काही बदल घडू लागले. एकेक निर्णय स्वार्थाने ग्रासले गेले. लोकांच्या कल्याणाऐवजी राजकारणी दबाव, लालसेचे दडपण, कोण्या उपटसूंभाच्या दाखवलेल्या स्वप्नांना तो माझा देव आहारी गेला,आणि भ्रष्ट यंत्रणेच्या दबावाखाली त्याचे विचार बदलले.जेव्हा मी पाहिलं की तो लाच स्वीकारतो, जेव्हा पाहिलं की गरिबांच्या जमिनींचं सौदेबाजी करतो, जेव्हा पाहिलं की अन्यायासमोर गप्प बसतो,निनावी अर्जाची चौकशी लावतो,आपल्या विरुद्ध अर्ज देईल म्हणून त्या दरोडेखारांचे ऐकतो,तेव्हा माझ्या आतला श्रद्धेचा दिवा हलायला लागला.
माझ्या अंतर्मनात देव मरू लागला…
मी त्याच्या सर्वांत जवळच्या माणसांपैकी एक होतो. मी त्याच्यासोबत दिवस-रात्र काम केलं होतं. त्याच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार होतो. म्हणून जेव्हा त्याने आपल्या मूल्यांना विकायला सुरुवात केली, तेव्हा ते मला त्याचे वागणे आतून पोखरू लागले.माझ्या अंतर्मनात एक देव होता. जो त्याच्या रूपात मी पाहिलेला होता. पण त्या देवाला मी हळूहळू मरताना पाहिलं. एक दिवस त्याने एका गरीब कुटुंबाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, कारण तिथे राजकारण होतं. त्या दिवशी तो देव माझ्यात अर्धवट मेला.बहुतेक माझ्या देवाला माहिती नाही की,कधीतरी शेवट असतोच.कोणीच सात बारा करून आलेले नाही. श्रीकृष्णने शिशुपालचे १०० पाप होण्या पर्यंत स्मितहास्य करत होते पण १०१ क्रमांकाची शिवी त्याच्या तोंडातून पूर्ण होऊ दिली नव्हती.पुढच्या आठवड्यात त्याने एका बेकायदेशीर प्रकल्पाला परवानगी दिली. पर्यावरणाचा, लोकांचा विचार न करता. त्या दिवशी माझा मनात उरलेला देव मरून गेला. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या देवाला मरणाताना पाहिलं.
देवत्व हे एक स्थिती असते, माणूस नाही…
तो अजूनही जिवंत आहे. पण शरीराने. अजूनही त्याच पदावर आहे. अजूनही त्याच्या गाडीवर लाल दिवा लागतो. पण माझ्यासाठी, आणि हजारोंसाठी तो देव कधीच संपला आहे.या युगात देवपणाची ओळख बदलली आहे. पूर्वी देव म्हटलं की त्याग, करुणा, न्याय, आणि निःस्वार्थ सेवा आठवायची. आज देव म्हटलं की प्रसिद्धी, पैसा, आणि पॉवर असे झाले आहे. आपण अनेकदा स्वतःच्या त्रासात एखाद्या व्यक्तीला देव मानतो, पण त्याच्या चुकांची जाणीव होताच देवपणाचा बुरखा गळून पडतो.
मी काहीच बोलू शकलो नाही…
एक दिवस त्याच्या केबिनमध्ये बसून मी त्याला पहात राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर एक आत्ममग्न हसू होतं. त्याला वाटत होतं की तो अजूनही लोकांचा तारणहार आहे. पण माझ्या डोळ्यांत अश्रू होते.कारण त्याला माहिती होते की मी चूक करत आहे पण त्याला थांबवू शकत नाही. कारण मला त्याच्या आत्म्याचं निधन पाहायला मिळत होतं.मी विचार करत राहिलो. मी ज्याला देव मानलं, त्याचं खरं रूप इतकं काळवट का आहे? माझं प्रेम, माझी श्रद्धा सर्व फसवी होती का? नाही, मी चुकीचं केलं नव्हतं. पण कधी कधी हे युग इतकं विषारी आहे की खरं देवपण जपून ठेवणं शक्य होत नाही. सत्ता, पैसा, दबाव आणि हाव, हे सगळं एकेक करून देवत्वाला गिळून टाकतं.
शेवटी मीच एक व्रत घेतलं…
त्या दिवशी मी ठरवलं, मी पुन्हा कधीच कुणालाही देव मानणार नाही. माणूस हा माणूसच असतो. अपूर्ण, चुकणारा, परिस्थितीला बळी पडणारा. आपलं श्रद्धास्थान कोण असावं हे ठरवताना विवेक आणि अनुभव दोन्ही आवश्यक असतात.खरं तर देव आपल्यातच असतो. आपल्या कृतीत, आपल्या विचारांत, आपल्या निःस्वार्थ सेवेत. ज्याचं मन निष्पाप आहे, ज्याचं हृदय संवेदनशील आहे, आणि जो अन्यायासमोर उभा राहतो. तोच देव आहे. बाकी सगळे केवळ मुखवटे,आणि ते सुद्धा अनेक मुखवटे.सर्व शक्तीमान रावण,बलशाली कंस,भस्मासुर,शिशुपाल,पुतना,कुं भकर्ण शिल्लक राहिले नाही. तर माझ्या देवाचे काय?
निष्कर्ष
कधी कधी या युगात देव पण मरण पावतो खरंय. माणूस जिवंत राहतो, पण त्यातलं देवत्व संपून जातं आणि जेव्हा तो देव आपल्यासाठी खास असतो, आपलं श्रद्धास्थान असतो, तेव्हा त्याचं मरण आपल्याला कोरडं करून जातं.देवाच्या मरणानं मी शिकलो की, खरं देवत्व म्हणजे स्थिती. व्यक्ती नव्हेआणि ते देवत्व आपल्याला शोधायचं असतं स्वतःमध्ये, आणि समाजासाठी केल्या जाणाऱ्या निःस्वार्थ सेवेमध्ये.
– बहिर्जी