उमरगा (प्रतिनिधी) – शहरातील चौसत्ता, गुलबर्गा रोड परिसरातील निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आलेल्या ओम लॉन्स अँड रिसॉर्टच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. समाजाभिमुख विचारसरणी आणि विकासात्मक दृष्टीकोन यांचा संगम घडविणारा हा सोहळा उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने संस्मरणीय ठरला. या प्रसंगी शांतिदूत परिवाराच्या वतीने नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यात आला. माणुसकीची चळवळ एक हात मदतीचा’ या ब्रीदवाक्याने प्रेरित उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक रविंद्र गायकवाड, लताबाई मोरे तसेच आकांक्षा चोगुले यांनी उपस्थिती दर्शवून सोहळ्याची शोभा वाढविली. त्यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शांतिदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विद्याताई जाधव, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, प्रा. जीवन जाधव, प्रा. युसूफ मुल्ला व प्रा. अमरकुमार हिरास आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी माजी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सर्वसिंही तसेच माजी नगराध्यक्ष सुलक्षणा शिंदे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सीबीएसई दहावी परीक्षेत ९९.२० टक्के गुण संपादन करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणारी कु. प्राची मुकुटे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. nतसेच विद्यानगरीचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, नगरसेवक रतनकर सागर आणि उद्योजक आयुब (कला रत्न पुरस्कार विजेते) यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक भाषणात प्रा. जीवन जाधव यांनी शांतिदूत परिवाराच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत ओम लॉन्स अँड रिसॉर्ट मुळे परिसरात आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्याचे नमूद केले. डॉ. विठ्ठल जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अमरकुमार हिरास यांनी मानले. उत्कृष्ट नियोजन, निसर्गसौंदर्य आणि उत्साही वातावरणामुळे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले. Kanthak Suryatal Post Views: 541 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खुनाचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक; मतदानाची तारीख ८ मे