नांदेड (प्रतिनिधी)– नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शेख जमील अहेमद यांच्याविरुद्ध तब्बल २ कोटी ८४ लाख रुपयांचा शासकीय निधी अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवकांचीही नावे आरोपी यादीत आहेत. तक्रारदार लतीफ खॉन पीर खान पठाण (वय ४०, व्यवसाय पत्रकार, रा. वाजेगाव) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सरपंच शेख जमील अहेमद यांनी २०१० पासून आजतागायत सरपंचपदावर राहून वेळोवेळी ग्रामसेवकांच्या मदतीने शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केला. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये मयत व्यक्तीच्या नावाने बँकेतून रक्कम काढण्यापासून ते धनादेशाच्या सहाय्याने करोडो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, शेख हुसेनाबी शेख मस्तान या महिलेचा मृत्यू ११ एप्रिल २०१६ रोजी झाला असताना, तिच्या नावे ६ ऑगस्ट २०१६ रोजी १२ हजार रुपये उचलण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या डीसीबी बँकेतील खात्यातून सरपंचांनी स्वत:च्या नावे १ लाख ४४ हजार व १ लाख ५६ हजार अशी दोन वेगवेगळी रक्कम २०१५ मध्ये काढल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्या शेख हनीफ यांच्या नावे १४ लाख २० हजार ७०० रुपये धनादेशाच्या सहाय्याने वटवून दलित वस्ती सुधारणेच्या नावे निधी वापरल्याचे दाखविले असले, तरी त्याचा कोणताही लेखाजोखा नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तत्कालीन उपसरपंच शेख मेहबुब यांनी सरपंच व ग्रामसेवकांच्या कारस्थानाला विरोध केला असता, त्यांना फसविण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ रोजी १० हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकण्यात आले आणि शासकीय निधीचा दुरूपयोग केल्याचेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.या एफआयआर मध्ये शेख जमील अहेमद अमीर हमजा (सरपंच), एस.एस.बोथीकर (ग्रामसेवक), एस. एस. देशमुख (ग्रामसेवक) आणि इतर ज्यांची नावे माहित नाहीत असे आरोपी सदरात नमूद आहेत. या प्रकरणाची चौकशी तत्कालीन विस्तार अधिकारी डी.एस. बच्छाव यांनी केली असून, त्यांनी १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर केलेल्या अहवालात सरपंच व ग्रामसेवकांनी पैशाचा अपहार केल्याचा उल्लेख केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील चौकशीतही सरपंच व ग्रामसेवकांवर अपहाराचे आरोप नमूद असून, १९ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २ कोटी ८४ लाख रुपये वसूल करण्याबाबत पत्र देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याचेही नमूद आहे.पोलिसांनी ही तक्रार नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि १२०-बी अंतर्गत गुन्हा क्रमांक /२०२६ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकरयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे हे तपास करीत आहेत. सद्यस्थितीत शेख जमील अहेमद अमीर हमजा (सरपंच) या एका आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आज शेख जमीलला पोलीस उप निरीक्षक सुनील भिसे,पोलीस अंमलदार संतोष जाधव,रवी संकुरवार,ओमप्रकाश कवडे यांनी न्यायालयात हजर करून पोलीस तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. पोलिसांच्या विनंती नुसार प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यानी शेख जमीलला सोमवार पर्यंत अर्थात ४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,018 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला स्थगिती; तथ्यशोधन समिती नियुक्त अरिजीतसिंग हत्या प्रकरणात नववा आरोपी गौरवसिंह पोलीस कोठडीत