सेवा देताना माणुसकी व कर्तव्याची भावना आवश्यक
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप
नांदेड:- रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा सोबतच इतर सर्व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी शासन- प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आज महाराजस्व अभियानातर्गंत भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहीवासी व शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले वासुदेव, गारुडी, मसणजोगी, जोशी, गोंधळी, पारधी, भोई समाजातील नागरिक आदीची उपस्थिती होती.
भटक्या विमुक्त जातीतील लोकाकडे कुठलाच पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना रहीवासी प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणून ते योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. यासाठी मागील काळात जिल्ह्यातील बळीरामपूर, चौफाळा, लोहा तालुक्यातील किवळा येथे शिबिराचे आयोजन करुन अनेक लोकांना रहीवासी प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. प्रमाणपत्राच्या उपलब्धीमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांच्यापर्यत पोहोचून ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमातही महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही भटक्या विमुक्तांना आवश्यक ते प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तत्परतेने केली याबाबतही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले. तसेच सेवा देताना अधिकारी कर्मचारी यांनी माणुसकी आणि कर्तव्याच्या भावनेतून नागरिकांची प्राध्यान्याने कामे करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच भटक्या विमुक्त जातीतील सुशिक्षित तरुणांनी समाजातील इतर लोकांची पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते 28 शिधापत्रिका, दोन उत्पनाचे प्रमाणपत्र, दोन जणांना रहीवासी प्रमाणपत्र, 9 जणांना जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आहे.
भटक्या विमुक्त जातीतील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळावा त्यांना समाजाच्या प्रवाहात येता यावे यासाठी विविध प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे यांनी खूप परिश्रम घेतले. याबाबत प्रशासनाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी मनोगत व्यक्त केली.