नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org संकेतस्थळावर 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाकडे जमा करावा. सदर पात्र लाभार्थ्याची पहिली निवड यादी अंतिम व प्रसिध्द 4 सप्टेंबर 2024 पर्यत करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित वसतीगृह गृहपाल यांनी सही शिक्क्यासह 3 सप्टेंबर 2024 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रूपये एवढी आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.
या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही.
विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.