आज आपल्या देशाची लोकशाही एका अत्यंत कठीण आणि धोकादायक वळणावर उभी आहे. घटनात्मक संस्थांची स्वायत्तता आणि त्यांची उत्तरदायित्व आज धोक्यात आली असून, जनतेचा या संस्थांवरील विश्वास कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने घेतलेली पत्रकार परिषद केवळ एका संघटनेची घोषणा नव्हती, तर तो व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला एक एल्गार होता.
संस्थात्मक उत्तरदायित्वाचा अभाव आणि जनतेचा रोष सध्या देशातील महत्त्वाच्या संस्था जसे की, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि मीडिया यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. न्यायव्यवस्थेबाबत बोलायचे झाले तर, सामान्य नागरिक जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा त्याला तारखांवर तारखा मिळतात, पण एखाद्या मोठ्या उद्योगपतीची याचिका असेल तर तातडीने सुनावणी होते. काही हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये तर मध्यरात्रीही न्यायालये उघडली गेली आहेत, मात्र सामान्य माणसाला आमच्याकडे वेळ नाही असे उत्तर दिले जाते. ही दुटप्पी भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणूक आयोगाची अवस्थाही वेगळी नाही. एकेकाळी मतदार सरकार निवडायचे, पण आज सरकार ठरवत आहे की मतदार कोण असेल आणि कोणी मतदान करायचे. जर निवडणूक आयोगाची उत्तरदायित्व निश्चित केली नाही, तर निवडणुका केवळ एक औपचारिकता उरेल आणि लोकशाहीचा गळा घोटला जाईल.

मीडियाची भूमिका: लोकशाहीचा आवाज की पक्षाचा प्रवक्ता? लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा मीडिया आज जनतेचा आवाज बनण्याऐवजी केवळ एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवण्यात मग्न आहे. सरकारचा कोणताही निर्णय असो, मीडिया त्याला मास्टरस्ट्रोक म्हणून गोंजारते. जंतरमंतरवरील ऐतिहासिक आंदोलनाकडे मुख्य प्रवाहातील मीडियाने पूर्णपणे पाठ फिरवली होती, तरीही जनतेच्या ताकदीमुळे ते आंदोलन यशस्वी झाले. मीडिया हा केवळ जाहिरातींवर चालतो, पण जर जनतेनेच टीव्ही पाहणे बंद केले, तर या जाहिरातींचा काहीही उपयोग होणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
राजकीय पक्ष का नाही? पब्लिक प्रेशर ग्रुप का? अनेकांना वाटते की CJP ने एक राजकीय पक्ष बनावे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जिथे ED, CBI आणि IT चा वापर करून पक्ष फोडले जात आहेत आणि जनतेच्या मताचे मूल्य शून्य केले जात आहे, तिथे नवा राजकीय पक्ष काढणे निरर्थक आहे. त्याऐवजी, जनतेमध्ये जागृती निर्माण करून एक पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून काम करणे अधिक प्रभावी ठरेल. कोणताही एक व्यक्ती किंवा संस्था देशाच्या सर्व समस्या सोडवू शकत नाही; हे आपण २०१४ मध्ये अनुभवले आहे. त्यामुळेच CJP आता विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांची एक मोठी आघाडी उभी करणार आहे, जी सरकारवर लोकहिताच्या कामांसाठी दबाव टाकेल.
तरुणांचे नेतृत्व आणि भविष्यातील वाटचाल CJP ने आपल्या संघटनेचा विस्तार करताना तरुणांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या संघटनेचे नेतृत्व ३० ते ३५ वयोगटातील तरुण करत आहेत.
- अभिजीत दिपके (३० वर्ष): संस्थापक आणि राष्ट्रीय निमंत्रक
- आशुतोष आणि सौरभ दास (२७ वर्ष): सह-निमंत्रक
- अजिंक्य शिंदे (३५ वर्ष): संघटना प्रमुख
- याशिवाय मीडिया समन्वयासाठी विजय रेड्डी, कायदेशीर बाबींसाठी रत्ना सिंग, तंत्रज्ञानासाठी रोहन देशपांडे आणि रिसर्चसाठी वैष्णवी गोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाला पाच झोनमध्ये (उत्तर, दक्षिण, पूर्व-ईशान्य, पश्चिम) विभागून संघटनेची बांधणी केली जाणार असून, योगेश इंगळे आणि दीपक बालियान यांसारखे नेते या झोनची जबाबदारी सांभाळतील.
जनतेला आवाहन आणि खबरदारी CJP ने आता अधिकृतपणे सदस्यत्व मोहीम सुरू केली असून, cockroachjanataparty.org या वेबसाईटवर नागरिक नोंदणी करू शकतात. हे एक नेतृत्वहीन आंदोलन असून, प्रत्येक जोडला गेलेला नागरिक हा स्वतःच एक नेता आहे. दरम्यान, संघटनेने हे देखील स्पष्ट केले आहे की, सध्यातरी ते कोणत्याही प्रकारचे फंड किंवा क्राउड फंडिंग गोळा करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये.शेवटी, लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य होय. हेच ब्रीद घेऊन कॉकरोच जनता पार्टी आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनआंदोलन उभे करण्यास सज्ज झाली आहे.
