नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने टनकपूर–नांदेड या नव्या साप्ताहिक एक्सप्रेस सेवेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्यानिमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी गाडी क्रमांक 05012 टनकपूर–नांदेड उद्घाटन विशेष एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे. या विशेष गाडीमुळे उत्तर भारत आणि मराठवाडा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटन विशेष गाडी 6 जुलै रोजी सकाळी 10.45 वाजता टनकपूर येथून सुटून 7 जुलै रोजी सायंकाळी 6.00 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
या गाडीला मार्गातील पिलीभीत, इज्जतनगर, बरेली, बदायूं, कासगंज, मथुरा, आग्रा कॅन्ट, धौलपूर, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ललितपूर, बीना, राणी कमलापती, इटारसी, खंडवा, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा आदी प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
उद्घाटन विशेष गाडीत एकूण 19 अत्याधुनिक एलएचबी (LHB) डबे असतील. यामध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय व तृतीय श्रेणी, शयनयान तसेच सामान-रक्षक (लगेज-कम-गार्ड) डब्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गाडीचे संपूर्ण संचालन एंड-टू-एंड इलेक्ट्रिक ट्रॅक्शनद्वारे करण्यात येणार असून त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियमित गाडी क्रमांक 17631/17632 नांदेड–टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसचे वेळापत्रक व सर्व थांबे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना या नव्या रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी रेल्वे चौकशी सेवा, NTES, IRCTC किंवा जवळच्या रेल्वे स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
