नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड रेल्वे विभागात उद्या होणाऱ्या खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे सेनेचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, नवज्योतसिंग गाडीवाले, युवा सेनेचे सचिन पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना संबंधित पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेतील सहा खासदारांनी पक्षाशी गद्दारी केल्यानंतर नांदेड रेल्वे विभागात प्रथमच बैठक होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून नोटिसा बजावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ठाकरे सेनेने या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी शिंदे गटाच्या दबावाखाली निष्ठावान शिवसैनिकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विविध पोलीस ठाण्यांमार्फत कार्यकर्त्यांना विनाकारण नोटिसा देऊन त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. नोटीस मिळाल्यानंतर प्रकाश मारावार, विजय बगाटे, नवज्योतसिंग गाडीवाले आणि सचिन पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा आमचा अधिकार कायम राहील. येणाऱ्या काळात जनता योग्य वेळी आपला कौल देईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा देऊन आवश्यक सूचना केल्यानंतर त्यांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. सत्ताधारी गटाच्या दबावामुळे कारवाई झाल्याचा आरोप हा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा असून, याबाबत पोलिसांकडून किंवा संबंधित शिंदे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. Kanthak Suryatal Post Views: 1,298 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मला वाटलं लोक त्यांचा द्वेष करतात, पण… – ट्रम्प यांनी मानली आपली हार! टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ; उद्या 6 जुलै रोजी उद्घाटन