नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात सध्या ३८ ते ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी झालेल्या बदल्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या बदल्या केवळ प्रशासकीय नसून, त्यामागे वसुली अर्थात मोदक हे मुख्य कारण असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. पोलीस दलातील जे कर्मचारी स्वतःला खूप हुशार किंवा ‘समजदार’ मानत होते, त्यांच्यावरच ही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा विचार केला असता, असा प्रश्न उपस्थित होतो की ही वसुली कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती? वसुलीची ही साखळी कशी चालते आणि कोणासाठी हे काम केले जाते, हे गुपित आता लपून राहिलेले नाही. मात्र, या व्यवस्थेत नेहमीप्रमाणे सर्वात शेवटच्या स्तरावरील सामान्य माणसालाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. या यादीत ज्या ३५ ते ४० पोलिसांचा समावेश आहे, त्याव्यतिरिक्त अनेक अशी नावे आहेत ज्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते, परंतु ती नावे या यादीतून का वगळण्यात आली, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
नांदेड मधील एसबीआय बँकेचे सोने गायब झाल्याचे प्रकरणही या तपासाशी जोडलेले आवश्यक आहे. या तपासात नक्की कोणी पुढाकार घेतला आणि काय घडले, हे शोधल्यास वसुलीचे खरे स्वरूप समोर येईल. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, केवळ बदली केल्याने हा भ्रष्टाचार थांबणार आहे का? अनेकदा हे पोलीस कर्मचारी स्वतः समोर न येता खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून वसुलीचे काम सुरू ठेवतात, असा संशय व्यक्त केला जात आहे.
जनतेची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने या सर्व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. जनतेला हे माहित असणे गरजेचे आहे की या कर्मचाऱ्यांची बदली नेमकी भ्रष्टाचाराच्या कारणास्तव झाली आहे. जर नावे स्पष्ट झाली, तरच नागरिक आणि विविध माफिया अशा कर्मचाऱ्यांना पैसे देणे थांबवतील. भ्रष्टाचार आणि खाजगी माणसांच्या माध्यमातून चालणारी ही वसुलीची साखळी तोडण्यासाठी केवळ बदल्या पुरेशा नाहीत, तर त्यावर कठोर वचक आणि पारदर्शकता निर्माण करण्याची गरज आहे.
असाच वसुली अर्थात मोदकांशी प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आला होता तेव्हा हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी ३० मे २०२६ रोजी ३९ पोलीस अंमलदाराच्या बदल्या केल्या होत्या.या वरून हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांचा भौगोलिक रचना पहिल्या तर नांदेड येथील पोलीस अमलदारांची संख्या कमीच आहे असे वाटते.
