नांदेडची पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी-प्रा.बळवंत शिंदे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये कंधार येथील मुंडे करिअर ऍकॅडमीच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गेसपेपरमधील गणिताच्या 25 पैकी 15 प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरती प्रक्रियेच्या परिक्षेत आले. यामुळे हा पेपर फुटला आहे असा आरोप करत स्पर्धा परिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.बळवंत शिंदे यांनी परिक्षेनंतर सुरु असलेली पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी आणि एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि नव्याने पोलीस भरती परिक्षा घ्यावी असे पत्रकार परिषदेत सांगितले. सोबतच प्रा.बळवंत शिंदे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आज हे निवेदन दिल्याचे सांगितले आहे.
कंधार येथे मुुंडे करिअर ऍकॅडमी आहे.त्याचे संचालक प्रा.वाय.टी.मुंडे आहेत. प्रा.बळवंत शिंदे यांनी सांगितले की, वाय.टी.मुंडे हे शासकीय सेवेत आहेत म्हणून त्यांना ही करिअर ऍकॅडमी चालविताच येत नाही. दि.15 मार्च 2026 रोजी नांदेडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परिक्षा झाली. या लेखी परिक्षेमध्ये गणिताच्या 25 प्रश्नांपैकी 15 प्रश्न मुंडे करिअर ऍकॅडमीने दिलेल्या गेसपेपरमध्ये आहेत. एखाद-दोन प्रश्न जशास तसे येवू शकतात. परंतू 15 प्रश्न येवू शकत नाहीत. ज्याचे विश्लेषण करतांना प्रा.बळवंत शिंदे यांनी सांगितले की, एक तर मुंडे ऍकॅडमीनेच गणिताचे प्रश्न दिले असतील किंवा कोणी तरी पोलीस खात्यातील सुर्याजी पिसाळने हे 15 प्रश्न मुंडे ऍकॅडमीला दिले असते. या संदर्भाचे अनेक व्हाटसऍप चॅट सुध्दा त्यांनी पत्रकारांना दिले. ज्यामध्ये एका परिक्षार्थी विद्यार्थीनीला 92 गुण मिळाले आहेत आणि ते तुमच्यामुळेच घडले असे ती लिहिते.
मुंडे ऍकॅडमीच्या व्हाटसऍप चॅटमध्ये असे शब्द लिहिले आहेत की, तुम्ही क्लास कोठेही करा पण प्रश्न तर येथूनच येणार, नाम तो सुनाही होगा, 15 गणित प्रश्न जशास तसे. प्रा.बळवंत शिंदे यांनी सांगितले की, या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मुंडे ऍकॅडमीचे 36 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. याला तुलनात्मक त्यांनी सांगितले की, यांच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये सुध्दा परिक्षा दिली त्यात फक्त 1 विद्यार्थी पास झाला. 50 हजार रुपये फिस विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि जर भरतीमध्ये यशस्वी झाले तर पुन्हा 50 हजार रुपये घेतले जातात.
या सर्व विश्लेषणानंतर आणि पुरावे दाखवल्या नंतर प्रा.बळवंत शिंदे म्हणाले की, ही परिक्षा झाली असली तरी भरती प्रक्रिया रोखावी, एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि परिक्षेचा पेपर पुन्हा एकदा घेण्यात यावा. नाही तर स्पर्धा परिक्षा संघर्ष समिती रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!