महिला व बाल विकास विभागाची प्रभावी कारवाई; १०९८ हेल्पलाईन ठरली आधार नांदेड – जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रभावी पावले उचलत गेल्या एका महिन्यात तब्बल ३६ बालविवाह थांबवण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत प्रशासनाने नियोजित बालविवाह रोखले असून, यामध्ये १०९८ या राष्ट्रीय आपत्कालीन बालसुरक्षा हेल्पलाईनची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी तसेच चाईल्ड लाईन १०९८च्या पथकांनी समन्वयाने काम करत १२ एप्रिल ते १३ मे या कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर त्वरित हस्तक्षेप केला. या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या तक्रारी १०९८ हेल्पलाईनवर प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या विविध यंत्रणांच्या मदतीने समुपदेशन, जनजागृती आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या माध्यमातून ३६ नियोजित बालविवाह थांबविण्यात आले. कारवाईदरम्यान तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ संरक्षण अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच अंगणवाडी सेविकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित वधू-वरांचे वय तपासून बालविवाह रोखण्यात आले. या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन मुलामुलींच्या आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम आणि कायदेशीर अडचणी टळल्या. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांतच जिल्ह्यात सहा बालविवाह थांबविण्यात आले आहेत. यामध्ये लोहा तालुक्यातील एक, नायगाव तालुक्यातील एक, कंधार तालुक्यातील दोन, बिलोली तालुक्यातील एक आणि उमरी तालुक्यातील एक अशा एकूण सहा घटनांचा समावेश आहे. बालविवाह रोखण्यात आलेल्या मुलींना पुढील काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलाचे विवाहासाठी किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 728 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणांत 70 लाखांचा गंडा राहुल गांधींचे दौरे विरुद्ध मोदीजींचे विदेश दौरे करत राहा तुलना