नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र अखेर हे प्रयत्न निष्फळ ठरले असून, २३ पैकी ११ जागांवर उमेदवार निर्विरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी २६ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३ संचालक पदांसाठी सुरुवातीला १७५ हून अधिक नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर अनेक अर्ज कायम राहिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शंभरहून अधिक उमेदवारांनी माघार घेतल्याने काही जागांवर बिनविरोध निवड झाली. मात्र सर्व जागा निर्विरोध करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच खासदार रविंद्र चव्हाण यांनी विविध स्तरांवर चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, काही मतदारसंघांत एकापेक्षा अधिक इच्छुक कायम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली. निर्विरोध निवडून आलेल्यांमध्ये डॉ. मीनल पाटील खतगावकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, मारोतीराव कवळे, श्रीनिवास चव्हाण, शिवराम लुटे, कैलास गोरठेकर, पूनम राजेश पवार आणि सुशिला बेटमोगरेकर यांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजेश कुंटूरकर, श्रावण भिलंवडे, बाळासाहेब रावणगावकर, शिवराज पाटील होटाळकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, निखिल जाधव, राजेश सुरोसे, प्रेमसिंग जाधव, बंडू नाईक यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतली. आता माहूर, मुखेड, अर्धापूर, भोकर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, नांदेड तसेच तीन राखीव मतदारसंघांतील जागांसाठी मतदान होणार आहे. या १२ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात असून, २७ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी मतमोजणी होऊन जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 766 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पंधरवाडयात 853 गुन्हे दाखल, 1114 इसमांविरुध्द कारवाई; 10 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा हिंगोलीमधील तक्रारदारांशी संवाद