नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा बार असोसिएशनच्या मे २०२६ मध्ये प्रस्तावित निवडणुकांवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. कार्तिक बोकारे यांनी बार कौन्सिलकडे तक्रार दाखल करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कार्यकारिणी निवडणुकांमध्ये महिला वकिलांना ३० टक्के प्रतिनिधित्व देण्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या तक्रारीचा प्राथमिक स्तरावर विचार केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर चौकशी आवश्यक असल्याचे बार कौन्सिलच्या निदर्शनास आले.
यामुळे बार कौन्सिलच्या पूर्ण सभेच्या ठरावानुसार तथ्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये अॅड. व्ही. डी. साळुंके (अध्यक्ष), अॅड. जी. के. पोफळे (सदस्य) आणि अॅड. एस. एम. पुंड (सदस्य) यांचा समावेश आहे.
समितीचा अहवाल सादर होईपर्यंत नांदेड जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती प्रधान जिल्हा न्यायाधीश तसेच बार असोसिएशनच्या अध्यक्षांना देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे नांदेडच्या कायदेवर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील निवडणूक प्रक्रिया समितीच्या अहवालानंतरच निश्चित होणार आहे.या स्थगिती आदेशावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सचिव शरद बागुल यांची स्वाक्षरी आहे. महिला आरक्षणाचा विषय प्रलंबित असतांना नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणूक का जाहीर करण्यात आली होती. किंवा निवडणूक जाहीर झाल्या नंतर स्थगिती येईल हि अपेक्षा ठेवूनच निवडणूक जाहीर करण्यात आली होती यात हेच राजकारण होते अशी चर्चा सुद्धा आता सुरु झाली आहे.
